
कृषी विभागाच्या ‘महाविस्तार एआय’ ॲपला सासकल (ता. फलटण) येथे मोठा प्रतिसाद मिळाला असून, गावातील तब्बल ९४ टक्के शेतकऱ्यांनी हे ॲप डाऊनलोड करून मोठा टप्पा गाठला आहे.
स्थैर्य, फलटण, दि. 18 ऑगस्ट : फलटण तालुक्यातील सासकल येथे कृषी विभागाच्या वतीने ‘महाविस्तार एआय’ (Mahavistaar AI) दिवस साजरा करण्यात आला. यावेळी गावातील तब्बल ९४ टक्क्यांहून अधिक म्हणजे ७२१ शेतकऱ्यांनी हे ॲप डाऊनलोड करून कृत्रिम बुद्धिमत्तेचा शेतीसाठी वापर करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे.
शेतकऱ्यांसाठी ॲप ठरतेय वरदान
राज्याचे कृषी प्रधान सचिव परिमल सिंह, कृषी आयुक्त सुरज मांढरे, विभागीय कृषी सहसंचालक जालिंदर पागिरे आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात येत आहे. सहाय्यक कृषी अधिकारी सचिन जाधव यांनी उपस्थित शेतकऱ्यांना या ॲपचे महत्त्व पटवून दिले. पेरणीपासून ते शेतमाल विक्रीपर्यंतची सर्व माहिती या ॲपवर एकाच ठिकाणी आणि मराठी भाषेत उपलब्ध असल्याने ते शेतकऱ्यांसाठी मोठे वरदान ठरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ॲपची प्रमुख वैशिष्ट्ये आणि सुविधा
या ॲपमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ‘एआय चॅटबॉट’ची सुविधा असून, शेतकरी मजकूर किंवा आवाजाद्वारे शेतीविषयक प्रश्न विचारू शकतात. याशिवाय, पिकांवरील रोग ओळखणे, अचूक हवामान अंदाज, खत व्यवस्थापन आणि बाजारभाव यांसारख्या अत्यंत उपयुक्त सुविधा यात आहेत. तसेच कृषी विभागाच्या विविध शासकीय योजनांची माहितीही यातून सहज मिळते. शेतकरी आपल्या ‘फार्मर आयडी’ किंवा मोबाईल नंबरद्वारे यात नोंदणी करू शकतात.
सासकल ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग
या विशेष उपक्रमास सासकलच्या सरपंच सोनाली मदने, उपसरपंच राजेंद्र घोरपडे, ग्रामविकास अधिकारी अशोक सापते यांच्यासह ग्रामस्थ आणि महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सासकल गावात ९४.२४ टक्के शेतकऱ्यांनी हे ॲप डाऊनलोड केल्यामुळे हे गाव आता राज्यात या ॲपच्या वापराबाबत एक आदर्श मॉडेल म्हणून ओळखले जाणार आहे.
