दैनिक स्थैर्य | दि. 08 मार्च 2024 | फलटण | फलटण शहरात “महाशिवरात्र उत्सव” उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील नागेश्वर, जब्रेश्वर, त्रीजटेश्वर, माणकेश्वर, श्रीराम मंदिर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
एका पौराणिक कथेनुसार, भगवान शंकर आणि पार्वती यांचा ज्या दिवशी विवाह झाला, तो दिवस म्हणजे महाशिवरात्रीचा दिवस असे म्हटले जाते. तसेच, या दिवशी अनेक जण शंकर-पार्वती यांचा विवाहदेखील लावतात, अशी माहिती मिळते. तसेच या दिवसाबद्दल अजून एक कथा प्रचलित आहे. ती गोष्ट म्हणजे ‘समुद्रमंथनाची’ कथा. या कथेनुसार, महाशिवरात्रीच्या दिवशी शंकराने, समुद्र मंथनातून निघालेले विष प्राषन करून सृष्टीचे रक्षण केल्याचेदेखील समजले जाते.
महाशिवरात्रीच्या दिवशी अनेक भाविक उपवास करतात, शंकराची पूजा करतात. हा दिवस केवळ आपल्या भारत देशातच नव्हे, तर नेपाळ आणि इतर दक्षिण आशियाई देशांमध्येदेखील साजरा केला जातो. महाशिवरात्रीच्या उत्सवाबद्दल प्रचलित असलेल्या विविध पौराणिक कथांप्रमाणेच, शिवरात्रीच्या नृत्य परंपरेलाही खूप महत्त्व आहे. इतकेच नाही तर त्याला थोडी ऐतिहासिक पार्श्वभूमीदेखील आहे. महाशिवरात्रीला कोणार्क, खजुराहो, पट्टाडकल, मोढेरा आणि चिदंबरम यांसारख्या प्रमुख हिंदू मंदिरांमध्ये वार्षिक नृत्य उत्सव आयोजित करण्यात येतो.