दैनिक स्थैर्य | दि. ८ मार्च २०२४ | फलटण |
दुग्ध व्यवसायामध्ये महिलांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन फलटण येथील गोविंद दूध डेअरीच्या संचालिका श्रीमंत शिवांजलीराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
श्रीमंत शिवांजलीराजे नाईक निंबाळकर यांनी मुंजवडी येथील जीवन संजीवनी आदर्श गोठ्यास भेट देऊन विविध योजनांची माहिती घेतली व मार्गदर्शनही केले. त्यावेळी त्या बोलत होत्या. सौ. स्वाती विजय पवार या हा ४० गाईंचा फार्म स्वतः सांभाळत असून ३५ ते ४५ लिटरच्या गाई त्यांनी त्यांच्या गोठ्यात भ्रूण प्रत्यारोपणसारख्या टेक्नॉलॉजीचा वापर करून तयार केल्या आहेत. त्या आपला गोठा सांभाळून आपले प्रशिक्षण केंद्रही चालवत आहेत. त्यांनी हजारो महिलांना दुग्ध व्यवसायाचे प्रशिक्षण दिले आहे.
गोठ्यास भेटीदरम्यान श्रीमंत शिवांजलीराजे म्हणाल्या की, मुक्त संचार गोठ्यामुळे आज महिलांचे काम बरेच कमी झालेले आहे. त्यांना दररोज शेण काढावे लागत होते, पाणी पाजावे लागत होते; परंतु आता ह्या मुक्त संचार गोठ्यामुळे ही सगळी कामे कमी झालेली आहेत . त्यामुळे हा शेणाचा व्यवसाय म्हणून राहिला नसून एक प्रतिष्ठित व्यवसाय झाला आहे व माझ्या महिला माता-भगिनींचे काम या मुक्त संचार गोठ्यामुळे बरेचसे कमी झालेले आहे.
माझ्या माता-भगिनींना दररोज रानातून चारा कापून आणायला लागत होता आणि हे फार कष्टाचे काम आहे; परंतु गोविंद डेअरीने सातत्याने मुरघास तंत्रज्ञान गावोगावी पोहोचवल्यामुळे आज महिलांचे रोजच्या रोज चारा कापून आणण्याबाबतचे बरेचसे काम कमी झालेले आहे. त्यामुळे दुधाचे उत्पादन तर वाढलेच आहे व दूध व्यवसायही फायदेशीर होण्यास मदत झालेली आहे, असेही श्रीमंत शिवांजलीराजे म्हणाल्या.
श्रीमंत शिवांजलीराजे पुढे म्हणाल्या की, ग्रीन गोविंद बायोगॅस सयंत्र योजना महिलांसाठी फार लाभकारी ठरत आहे. आज या योजनेमार्फत ९०% अनुदानावर जवळजवळ साडेपाच हजार बायोगॅस गोविंद डेअरीमार्फत पशूपालकांना देण्यात आले असून त्यामुळे महिलांना चुलीपुढे धुरात काम करण्याची गरज राहिली नाही. त्यांना बायोगॅसमार्फत कमी खर्चामध्ये इंधन उपलब्ध होत आहे. चांगल्या गुणवत्तेचे खतही या बायोगॅसमधून मिळत असल्यामुळे बर्याच महिला या योजनेमुळे सुखी झाल्या आहेत. आज बर्याच महिला दुग्ध व्यवसायामध्ये अग्रेसर असून त्या आपला गोठा स्वतंत्रपणे सांभाळत आहेत.
यामध्ये त्या भ्रूण प्रत्यारोपणसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उच्च वंशावळीच्या गाई तयार करण्यामध्ये सुद्धा महिलांचे योगदान मोठे आहे. आज जवळजवळ साडेसात हजार कालवडी या उच्च गुणवत्तेच्या वीर्य मात्रेपासून तयार झाल्या आहेत. या आपल्या वातावरणामध्ये टिकणार्या व आजारांना कमी बळी पडून जास्त दूध देणार्या कालवडी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे दुग्ध व्यवसाय फायदेशीर होण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे. आज फलटण परिसर हा महाराष्ट्राला चांगल्या गुणवत्तेच्या गाई पुरवण्याचे काम काही दिवसात नक्कीच सुरू करेल, इतक्या उच्च गुणवत्तेच्या कालवडी या भागात आज तयार होत आहेत. यामध्ये महिलाही फार अग्रेसर असून त्यांची भूमिका सुद्धा फार महत्त्वाची आहे, असे उद्गार श्रीमंत शिवांजलीराजे नाईक निंबाळकर यांनी मुंजवडी येथील गोठा भेटीदरम्यान काढले.
श्रीमंत शिवांजलीराजे यांनी यावेळी गोठामालक स्वाती पवार यांचे कौतुक करून गोविंद डेअरीकडून सर्व महिलांना जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.