राज्यात आणखी तीन कामगार संहितांची नियमावली महिनाभरात; कामगारांच्या हक्कांबाबत मोठा निर्णय

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

वेतन नियमावलीनंतर आता राज्यात औद्योगिक संबंध, सामाजिक सुरक्षा आणि व्यावसायिक सुरक्षा या तीन कामगार संहितांची नियमावली महिनाभरात लागू होणार आहे.

स्थैर्य, सातारा, दि. २३ नोव्हेंबर : केंद्र सरकारने लागू केलेल्या चार कामगार संहितांना अनुरूप नियमावली तयार करण्याचे राज्य सरकारचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. नुकतीच वेतन नियमावली अधिसूचित करण्यात आली असून, येत्या महिनाभरात उर्वरित औद्योगिक संबंध, सामाजिक सुरक्षा आणि व्यावसायिक सुरक्षा या तीन संहितांची नियमावली जाहीर केली जाणार असल्याची माहिती कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिली.

चार कामगार संहितांमध्ये नेमक्या कोणत्या तरतुदी?

केंद्र सरकारने जुने २९ कामगार कायदे एकत्रित करून चार नवीन कामगार संहिता तयार केल्या आहेत. यामध्ये वेतन संहितेद्वारे किमान वेतन, वेतन देण्याची पद्धत आणि समान वेतनाचे नियम निश्चित झाले आहेत. औद्योगिक संबंध संहितेमध्ये कामगार व व्यवस्थापन संबंध, संघटनांची मान्यता आणि औद्योगिक वाद निवारणाची तरतूद आहे. सामाजिक सुरक्षा संहितेमध्ये भविष्य निर्वाह निधी, कर्मचारी विमा, ग्रॅच्युइटी, मातृत्व लाभ आणि गिग कामगारांच्या सुरक्षेचा समावेश आहे, तर व्यावसायिक सुरक्षा संहितेत कामाच्या ठिकाणची सुरक्षितता, आरोग्य आणि कामाच्या तासांचे नियम ठरवण्यात आले आहेत.

विधी विभागाची मंजुरी मिळताच अधिसूचना प्रसिद्ध होणार

उर्वरित तीन संहितांची नियमावली तयार असून ती सध्या विधी विभागाच्या स्तरावर अंतिम प्रक्रियेत आहे. यासाठी नव्याने मंत्रिमंडळाची मान्यता घेण्याची आवश्यकता नसल्याने येत्या काही दिवसांतच ही अधिसूचना प्रसिद्ध होईल, असे कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. राज्याची स्वतंत्र नियमावली लागू झाल्यानंतर केंद्राचा कायदा आणि राज्याचे नियम यांतील संदिग्धता दूर होऊन कामगार व उद्योजकांना स्पष्ट कायदेशीर चौकट उपलब्ध होणार आहे.

 

 

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!