
थेट WhatsApp वर मिळवा
राज्यात नव्या ऊस गाळप हंगामाला सुरुवात झाली असली तरी, मागील हंगामातील ११ कोटी रुपयांची एफआरपी अद्याप २१ साखर कारखान्यांकडे थकीत असल्याचे समोर आले आहे.
स्थैर्य, सातारा, दि. २२ ऑक्टोबर : महाराष्ट्रात नव्या गाळप हंगामाचा बिगूल वाजला आहे. मात्र, गतवर्षीच्या हंगामातील शेतकऱ्यांचे पैसे अद्याप पूर्णपणे मिळाले नसल्याची बाब समोर आली आहे. साखर आयुक्तालयाने प्रसिद्ध केलेल्या ताज्या अहवालानुसार, मागील हंगामातील तब्बल ११ कोटी रुपयांची एफआरपी (FRP) अद्याप २१ साखर कारखान्यांनी अदा केलेली नाही.
हंगामातील गाळप आणि एफआरपीची स्थिती
साखर आयुक्तालयाच्या अहवालानुसार, मागील गाळप हंगामात सहभागी झालेल्या राज्यातील एकूण २१० साखर कारखान्यांपैकी १८९ कारखान्यांनी शेतकऱ्यांना १०० टक्के एफआरपी अदा केली आहे. या कारखान्यांनी मोठ्या प्रमाणावर उसाचे गाळप करत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले आहेत. मात्र, उर्वरित २१ कारखान्यांनी अद्याप शेतकऱ्यांचे पूर्ण पैसे दिलेले नाहीत.
कारखान्यांची सद्यस्थिती आणि कारवाई
काही कारखान्यांनी ८० ते ९९ टक्के तर एका कारखान्याने ५९ टक्क्यांपेक्षा कमी एफआरपी दिली आहे. शेतकऱ्यांच्या थकीत रकमेचा प्रश्न गंभीर बनल्यामुळे संबंधित २१ साखर कारखान्यांवर साखर आयुडकत्यालयाकडून आरआरसी (RRC) अंतर्गत कायदेशीर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.





