महाराष्ट्राला दर आठवड्याला कोरोना प्रतिबंध लसीचे २० लाख डोस उपलब्ध करून द्यावेत – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे मागणी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि. १७: राज्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लसीकरणाला गती देण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत आहे. प्राधान्यक्रमाच्या गटातील सुमारे १.७७ कोटी जनतेचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट असून त्यासाठी २.२० कोटी डोस उपलब्ध करून देण्याची मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.हर्षवर्धन यांच्याकडे केली. आरोग्यमंत्री श्री. टोपे दिल्ली दौऱ्यावर होते त्यावेळी त्यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण उपस्थित होते.

यासंदर्भात माहिती देताना आरोग्यमंत्री श्री.टोपे म्हणाले की, राज्यात कोरोना प्रतिबंध लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात व यशस्वीरीत्या राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने आरोग्य कर्मचारी, अत्यावश्यक सेवा पुरवणारे कर्मचारी त्याचबरोबर ६० वर्षावरील व ४५ वयोगटा वरील (सहव्याधी असलेले) सर्वांना लस देण्यात येत आहे. त्यामध्ये १.७७ कोटी लोकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट असून या सर्वांना पहिला डोस मे पर्यंत तर दुसरा डोस जून पर्यंत देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी २.२० कोटी कोव्हीडशिल्ड व कोव्हॅक्सिन लसींची आवश्यकता आहे. या अनुषंगाने दर आठवड्यात २० लाख लसींचा पुरवठा करण्याची विनंती आरोग्यमंत्री श्री.टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केली आहे.

राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी तत्काळ पुरेशा लसींचा पुरवठा करण्याची मागणी आरोग्यमंत्री श्री. टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केली आहे.

२०९ खासगी आणि शासकीय रुग्णालयांना लसीकरण केंद्र उभारण्याची परवानगी

राज्याच्या आरोग्य विभागाने लसीकरणासाठी ३६७ खासगी व शासकीय रुग्णालयांमध्ये लसीकरण केंद्र उभारण्याची परवानगी देण्याची मागणी केंद्र शासनाकडे केली आहे. त्यापैकी २०९ रुग्णालयांना परवानगी देण्यात आली आहे. उर्वरित रुग्णालयांना लवकरात लवकर परवानगी देण्यात यावी. लसीकरणानंतर आढळून येणाऱ्या दुष्परिणामांची संख्या किरकोळ असून लसीकरण केंद्रासाठी १०० खाटांचे रुग्णालय असावे या निकषातून सवलत द्यावी आणि ५० बेड असलेल्या रुग्णालयामध्येही केंद्र सुरू करावे जेणेकरून लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य करणे शक्य होईल असे श्री.टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांशी चर्चा करताना सांगितले.


Back to top button
Don`t copy text!