
थेट WhatsApp वर मिळवा
राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार राज्य सरकारने नर्सरी ते पहिली प्रवेशासाठी वयाची अट निश्चित केली असून, २०२७-२८ पासून याची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी केली जाणार आहे.
स्थैर्य,सातारा, दि. १७ ऑक्टोबर : राज्यातील शाळांमध्ये बालकांच्या प्रवेशासाठी विविध बोर्डांचे निकष वेगवेगळे असल्यामुळे निर्माण होणारी संदिग्धता दूर करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. या नवीन नियमांनुसार नर्सरीपासून ते इयत्ता पहिलीपर्यंतच्या प्रवेशासाठी वयाची निश्चित मर्यादा लागू करण्यात आली असून, ३० जून ही कट-ऑफ तारीख ठरवण्यात आली आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) २०२० च्या सुसंगत हा निर्णय घेण्यात आला आहे.
टप्प्याटप्प्याने असणार वयाचे निकष
शासनाच्या या निर्णयानुसार शैक्षणिक वर्ष २०२७-२८ पासून नर्सरी किंवा बालवाटिका-१ साठी किमान ३ वर्षे वयोमर्यादा असेल. त्यानंतर २०२८-२९ मध्ये जुनिअर केजीसाठी ४ वर्षे, २०२९-३० मध्ये सिनिअर केजीसाठी ५ वर्षे आणि २०३०-३१ मध्ये इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी बालकाचे वय ६ वर्षे पूर्ण असणे बंधनकारक करण्यात आले आहे. हे सर्व नियम संबंधित वर्षाच्या ३० जूनपर्यंतच्या वयावर आधारित असतील.
सध्याच्या विद्यार्थ्यांसाठी सवलत
या नवीन नियमांमुळे आधीपासून शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना कोणताही फटका बसणार नाही. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये आधीच नर्सरी ते पहिलीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना या नवीन वयोमर्यादेतून वगळण्यात आले आहे. तसेच नियमित शाळांमध्ये आधीच शिक्षण घेत पुढील वर्गात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देखील हे नियम लागू असणार नाहीत. शाळा स्तरावर मुख्याध्यापकांना वयोमर्यादेत १५ दिवसांपर्यंत शिथिलता देण्याचा अधिकार देण्यात आला आहे.





