
खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यतेसाठी शिक्षण विभागाने स्वतंत्र ऑनलाईन पोर्टल सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
स्थैर्य, सातारा,दि. १३ सप्टेंबर : राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकेतर पदांच्या भरतीप्रक्रियेला गती देण्यासाठी शिक्षण विभागाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. कनिष्ठ लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहाय्यक या संवर्गातील कर्मचाऱ्यांना वैयक्तिक मान्यता देण्यासाठी आणि शालार्थ प्रणालीशी संबंधित कार्यवाही पूर्ण करण्यासाठी स्वतंत्र ‘शिक्षकेतर वैयक्तिक मान्यता पोर्टल’ तयार करण्यात आले आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी यासंदर्भात स्पष्ट निर्देश जारी केले आहेत.
८० टक्के पदे सरळसेवेने भरणार
शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागांवर भरती प्रक्रिया राबवण्यास मान्यता देण्यात आली आहे. या भरतीपूर्वी शाळांमध्ये पदोन्नती आणि अनुकंपा नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक असेल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही रिक्त राहिलेल्या पदांपैकी संचमान्यतेनुसार ८० टक्के पदे सरळसेवेने भरली जातील. सरळसेवा भरतीसाठी शैक्षणिक संस्थांना अद्ययावत बिंदुनामावली तपासून जाहिरातीचे प्रारूप शिक्षण विभागाकडून मंजूर करून घ्यावे लागणार आहे.
पारदर्शक प्रक्रियेसाठी ऑनलाईन संकेतस्थळ
भरती प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी जाहिरात स्थानिक व राज्यस्तरीय वृत्तपत्रांसह संस्थेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी लागेल. अर्ज, छाननी आणि मुलाखत प्रक्रियेसाठी उमेदवारांना पुरेसा कालावधी दिला जाईल. तसेच मुलाखतीचे इन-कॅमेरा चित्रीकरण करणे संस्थांना अनिवार्य करण्यात आले आहे. नवीन नियुक्त्यांसह २८ मे २०२५ पूर्वी झालेल्या नियुक्त्यांची वैयक्तिक मान्यता आणि शालार्थ संबंधीची कामे याच ऑनलाईन पोर्टलद्वारे केली जाणार आहेत.