महाराष्ट्र हे पर्यटनाचे ‘ग्रोथ इंजिन’- पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे


स्थैर्य, मुंबई, दि.३: महाराष्ट्राला पर्यटन क्षेत्रात देशात अव्वल आणण्यासाठी शासन आणि हॉटेल असोसिएशनने एकजुटीने काम करण्याची गरज आहे. आदरातिथ्य क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन, दृष्टीकोन आणि संकल्पनांची देवाणघेवाण करुन महाराष्ट्र हे पर्यटनाचे ‘ग्रोथ इंजिन’ बनले आहे, असे प्रतिपादन पर्यटनमंत्री श्री.आदित्य ठाकरे यांनी केले.

पर्यटनमंत्री श्री.आदित्य ठाकरे यांच्या प्रयत्नाने गेल्या 20 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या आदरातिथ्य (हॉस्पिटॅलिटी) क्षेत्राला उद्योगाचा दर्जा मिळाल्याबद्दल फेडरेशन ऑफ हॉटेल ॲण्ड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया, हॉटेल ॲण्ड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया, हॉटेल असोसिएशन ऑफ इंडियाकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, एफएचआरएआय चे उपाध्यक्ष गुरबक्सीश सिंह कोहली, पर्यटन संचालक डॉ.धनंजय सावळकर, एचआयएचे अध्यक्ष श्री.भाटिया, श्री.चटवाल आदी मान्यवर उपस्थित होते.

सत्काराला उत्तर देताना श्री.ठाकरे यावेळी म्हणाले, कोविड महामारीच्या काळात हॉटेल व्यावसायिकांनी मोलाची कामगिरी केली आहे. डॉक्टर्स, नर्स आणि पॅरामेडिकल स्टाफ हे सातत्याने संकटाला तोंड देत होते. अशा वेळी त्यांना सोयीसुविधा देऊन, ‘अतिथी देवो भव’ या निस्वार्थी भावनेने त्यांच्या निवासाची सोय करुन हॉटेल असोसिएशनने सहकार्य केले. लॉकडाऊनच्या काळात अनेक व्यवसाय, उद्योगधंदे आणि पर्यटन क्षेत्र बंद असताना त्यांना चालना देण्यासंदर्भात शासन स्तरावर सातत्याने चर्चा सुरु होती. त्यातून पर्यटन विभागाच्या अस्तित्वात असलेल्या धोरणात बदल करणे गरजेचे असल्याचे लक्षात आल्यानंतर आदरातिथ्य (हॉस्पिटॅलिटी) क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देऊन पर्यटन तसेच रोजगार निर्मितीलाही चालना देता येईल यावर एकमत झाले. लॉकडाऊननंतर राज्याच्या मिशन बिगिन अगेन या संकल्पनेंतर्गत ही चांगली सुरुवात होत आहे. आदरातिथ्य क्षेत्राला उद्योगाचा दर्जा हॉटेल उद्योगासाठी लाभदायक ठरणार आहे. इज ऑफ डुईंग बिझनेस च्या माध्यमातून उद्योग उभारण्यासाठी लागणाऱ्या परवानग्या अधिक सुलभ रितीने मिळण्यासाठी ‘सिंगल स्टॉप’ तसेच ‘डेस्क’ या संकल्पना सुरु करण्याचा विचार शासन करीत असून परवाने प्राप्तीसाठी ही संकल्पना प्रभावी ठरणार आहे, असा विश्वास श्री. ठाकरे यांनी व्यक्त केला.

श्री. ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रात पर्यटनवृद्धीच्या अनेक संधी असून पर्यटन क्षेत्राला प्रोत्साहित करण्यासाठी वन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, सिंचन विभाग यांच्या सहकाऱ्याने चांगले पर्यटन स्थळ विकसित करण्याचे काम चालू आहे. कोविड-19 नंतर पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी मुंबईसारख्या महानगरामध्ये आठवड्याचे सात दिवस, 24 तास सेवा उपलब्ध करण्याची परवानगी देण्यात आली. राज्य शासन पर्यटन क्षेत्राला आणि त्याच्या विकासाला नेहमी प्राधान्यक्रम देत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली युद्धपातळीवर काम चालू आहे. संधीचा उपयोग करुन महाराष्ट्राला पर्यटन क्षेत्रात देशात अव्वल आणण्यासाठी शासन आणि हॉटेल असोसिएशनने एकजुटीने काम करण्याची गरज आहे. हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन, दृष्टीकोन आणि संकल्पनांची देवाणघेवाण करु. मुंबईतील पर्यटनाला चालना देण्यासाठी नुकतेच बृन्हमुंबई महानगरपालिकेत हेरिटेज वॉक ही संकल्पना सुरु केली आहे. त्याप्रमाणे आगामी काळात व्हिंटेज कार म्युझियम, वॉकिंग टूर, गेट वे ऑफ इंडियाचे सुशोभीकरण अशा विविध संकल्पना आगामी काळात राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती श्री.ठाकरे यांनी यावेळी दिली.


Back to top button
Don`t copy text!