
थेट WhatsApp वर मिळवा
राज्यातील अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने २९१ कोटी ९१ लाख रुपयांची मदत जाहीर केली असून, यामुळे ३ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.
स्थैर्य, सातारा, दि. ०३ नोव्हेंबर : राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये जून ते ऑगस्ट २०२६ या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने बाधित शेतकऱ्यांसाठी २९१ कोटी ९१ लाख ४ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे राज्यातील ३ लाख ९ हजार २८९ शेतकऱ्यांना थेट लाभ मिळणार आहे.
पीक व शेतजमिनीच्या नुकसानीसाठी मदत
या विशेष आर्थिक पॅकेजअंतर्गत पीक नुकसानीसाठी २६२ कोटी ७० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, हा निधी थेट लाभ हस्तांतर (डीबीटी) प्रणालीद्वारे पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे. तसेच शेतजमिनीचे नुकसान झालेल्या ३४ हजार ९८४ शेतकऱ्यांसाठी २९ कोटी २१ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. यात जमीन वाहून जाणे, शेतात गाळ किंवा वाळू साचणे यांसारख्या नुकसानीचा समावेश असून अल्प भूधारक शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे.





