
थेट WhatsApp वर मिळवा
दोन दशकांत आठव्यांदा दुष्काळाचा सामना करणाऱ्या महाराष्ट्राला सावरण्यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे ५ हजार ३०० कोटी रुपयांच्या विशेष निधीची मागणी केली आहे.
स्थैर्य, सातारा, दि. ०८ ऑक्टोबर : वातावरणीय बदलांमुळे गेल्या दोन दशकांत राज्यावर तब्बल आठव्यांदा दुष्काळाचे गंभीर संकट आले आहे. या पार्श्वभूमीवर दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलली आहेत. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीच्या (NDRF) माध्यमातून केंद्राकडून अधिकाधिक आर्थिक मदत मिळावी यासाठी राज्य शासनाने ५ हजार ३०० कोटी रुपयांच्या प्राथमिक मदतीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला आहे. तसेच एनडीआरएफच्या नेहमीच्या निकषांपलीकडे जाऊन विशेष बाब म्हणून राज्याला अतिरिक्त मदत पॅकेज देण्याची विनंतीही करण्यात आली आहे.
केंद्रीय पथकाच्या अहवालानंतर मदतीचा निर्णय
राज्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते, ज्यासाठी ८८८ कोटी रुपयांची मदत वितरीत करण्यात आली आहे. मात्र, त्यानंतर पावसाने दडी मारल्यामुळे राज्यातील २५हून अधिक जिल्ह्यांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. केंद्रीय पथक लवकरच राज्यातील प्रभावित भागांचा दौरा करून पाहणी करणार असून, त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर केंद्र सरकारकडून अंतिम निधी मंजूर केला जाईल.
शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदतीची तयारी
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने स्वतःच्या तिजोरीतूनही मदतीची आखणी सुरू केली आहे. पीक पंचनाम्यांचे अहवाल प्राप्त होताच थेट डीबीटीद्वारे (DBT) निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे. आगामी सणासुदीच्या काळात बळीराजाला दिलासा देऊन त्यांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न असल्याचे मदत व पुनर्वसन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.





