दैनिक स्थैर्य | दि. 21 मार्च 2024 | फलटण | राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष, माजी मंत्री तथा विद्यमान आमदार महादेव जानकर हे आज सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या भेटीसाठी त्यांच्या फलटण येथील “सरोज – व्हिला” या निवासस्थानी दाखल झाले आहेत. यावेळी फलटण बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांची सुद्धा उपस्थिती आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महादेव जानकर हे स्वतः इच्छुक असून महाविकास आघाडी कडून त्यांच्या नावाची चर्चा काही दिवसांपूर्वी सुरू होती. माढा लोकसभा मतदारसंघासाठी श्रीमंत संजीवराजे हे सुद्धा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते.
महादेव जानकर यांनी आज श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या भेटीसाठी आल्याने फलटण तालुक्यासह माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे.
विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वामध्ये आज फलटण येथे राजे गटाचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्यापूर्वी महादेव जानकर यांनी श्रीमंत संजीवराजे यांचे घेतलेल्या भेटीमुळे विविध चर्चांना उधाण आले आहे.
महादेव जानकर, श्रीमंत संजीवराजे व श्रीमंत रघुनाथराजे यांच्यामध्ये सुमारे अर्धा तास कमरा बंद चर्चा सुरू आहे.