दैनिक स्थैर्य | दि. 21 मार्च 2024 | फलटण | विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी होवू घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन आज दि. 21 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता अनंत मंगल कार्यालय, कोळकी येथे केले आहे.
गतकाही महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी अनंत मंगल कार्यालय, कोळकी येथे कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी महायुती अर्थात भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिवसेना यांच्याकडे आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने माढा लोकसभा मतदारसंघांमधून सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना उमेदवारी मिळावी; यासाठी कार्यकर्त्यांकडून आग्रही मागणी करण्यात आली होती.
गत काही महिन्यांपूर्वी झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये जर श्रीमंत संजीवराजे यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली नाही; तर विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना सुद्धा उमेदवारी मिळू देणार नाही; असा निर्धार श्रीमंत रामराजे यांनी व्यक्त बोलून दाखवला होता.
परंतु महायुती मध्ये भारतीय जनता पार्टीने माढा लोकसभा मतदारसंघाची उमेदवारीही विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनाच जाहीर केल्याने आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये श्रीमंत रामराजे यांचा गट काही वेगळी भूमिका घेणार का? श्रीमंत रामराजे यांचा गट हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटामध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुद्धा फलटणमध्ये सुरू झाल्या आहेत.
गत दोन दिवसांपूर्वी मुंबई येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या “सागर” निवासस्थानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांची बैठक संपन्न झाली होती. सदरील बैठकीमध्ये श्रीमंत रामराजे यांनी महायुतीचे काम करावे; असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले होते. त्यावर श्रीमंत रामराजे यांनी मतदार संघामध्ये जाऊन सर्वसामान्य कार्यकर्त्यांची भावना व मते जाणून घेणार असल्याबाबतची माहिती सोशल मीडिया द्वारे दिली होती.