स्थैर्य, महाबळेश्वर, दि.५: महाबळेश्वर येथील एकाला २५ लाख रुपयांचे कर्ज मंजूर करून देतो असे खोटे सांगून कर्ज प्रक्रियेकरिता फिर्यादीकडून तीन लाख दहा हजार आठशे पंच्याऐंशी रुपये घेतल्याप्रकरणी मिलिंद किणी (रा. पुणे) व संजय बालिका (रा.औरंगाबाद) यांच्या विरुद्ध दोन महिन्यांपूर्वी महाबळेश्वर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामधील मिलिंद किणी यास पोलिसांनी पिंपरी चिंचवड मधून ताब्यात घेतले.
नऊ एप्रिल २०१९ ते ०९ ऑक्टोबर २०१९ या कालावधीत मिलिंद किणी व संजय बालिका यांनी आपापसात संगनमत करून फिर्यादी सुनील भाऊ ढेबे (रा. हॉटेल कृष्णा, महाबळेश्वर) यांना २५ लाख रुपयांचे कर्ज मंजूर करून देतो असे खोटे सांगून कर्ज प्रक्रियेकरिता सुमारे तीन लाख दहा हजार आठशे पंच्याऐंशी रुपये घेऊन कर्ज मंजूर न करता व घेतलेले पैसे परत न दिल्याने फिर्यादी सुनील भाऊ ढेबे यांनी आॅक्टोबर महिन्यामध्ये महाबळेश्वर पोलीस ठाण्यात मिलिंद किणी (रा. प्रेमलोक पार्क चिंचवड, पुणे) व संजय बालिका (रा. औरंगाबाद) यांच्या विरुद्ध फसवणुकीची तक्रार दाखल केली होती.
महाबळेश्वर पोलिसांनी कलम ४२०,३४ प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा देखील दाखल केला होता. पोलिस निरीक्षक बी.ए कोंडुभैरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार संदीप साबळे, रमेश काळे, श्रीकांत कांबळे यांच्या पथकाने फसवणुकीतील मिलिंद किणी यास पिंपरी चिंचवड पोलिस ठाण्याच्या मदतीने राहत्या घरातून ताब्यात घेत अटक केली.