दादाच्या आजारपणाचा कंपनीला धसका; जाहिरात घेतली मागे


स्थैर्य, नवी दिल्ली, दि.५: भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार आणि भारतीय क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष (BCCI) सौरव गांगुली यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे ते हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर अदानी विलमार कंपनीने गांगुली यांच्या सर्व जाहिराती मागे घेतल्या आहेत. सौरव गांगुली यांनी फॉर्च्यून राईस ब्रॅन कुकिंग ऑईलची जाहीरात केली होते. आता त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने कंपनीने त्यांची जाहिरात मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचं समजतंय.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, माजी कर्णधाराच्या सर्व जाहिराती मागे घेण्यात आल्या आहेत. तसेच जाहिरातीसाठी नवे कॅम्पेन तयार करण्याच्या सूचना त्यांच्या जाहिरात एजेंसीला देण्यात आल्या आहेत. सौरव गांगुली कौलकातामधील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.

क्रिकेटमधील दादा अर्थात सौरव गांगुली यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्यानंतर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर सौरव गांगुली यांच्यावर अ‍ॅन्जिओप्लास्टी करण्यात येणार असल्याचे बोलले जात होते. मात्र यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.

शनिवारी जीममध्ये व्यायाम करत असताना सौरव गांगुली यांच्या छातीत दुखायला लागले. त्यामुळे त्यांना कोलकाता येथील वूडलँड्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर अ‍ॅन्जिओप्लास्टी देखील करण्यात आली होती. गांगुली यांच्यासोबत त्यांची पत्नी डोना गांगुली आणि भाऊ स्नेहाशीष आहेत. आयपीएल 2020 स्पर्धेपासून सौरव गांगुली कामात व्यस्त होते. क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांसह राजकीय आणि इतर क्षेत्रातील  अनेक दिग्गज मंडळी गांगुलींनी लवकरात लवकर बरे व्हावे, अशी प्रार्थना करत आहेत

 


Back to top button
Don`t copy text!