
थेट WhatsApp वर मिळवा
महाबळेश्वरमधील सेवा क्षेत्रातील आस्थापनांना भेट देऊन रोजगार योजनांची माहिती देण्यात आली असून हॉटेल असोसिएशनसोबत संयुक्त बैठक पार पडली.
स्थैर्य, महाबळेश्वर, दि. ०६ ऑक्टोबर : शासनाच्या निर्देशानुसार राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सातारा यांच्यावतीने महाबळेश्वर तालुक्यातील सेवा क्षेत्रातील विविध आस्थापनांना भेटी देऊन योजनांबाबत जनजागृती करण्यात आली.
रोजगार पोर्टलवर नोंदणीचे आवाहन
अभियानांतर्गत तालुक्यातील हॉटेल्स, रिसॉर्ट्स व सेवा क्षेत्रातील आस्थापनांच्या प्रमुखांची भेट घेऊन शासनाच्या रोजगार व कौशल्य विकास योजनांची माहिती देण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या रोजगार व कौशल्य पोर्टलवर आस्थापनांनी नोंदणी करावी, असे आवाहन अधिकारी वर्गाने केले. काही आस्थापनांचे नोंदणी अर्ज प्रत्यक्ष जागेवरच भरून घेण्यात आले.
हॉटेल असोसिएशनसोबत विशेष बैठक
सर्व्हिस क्षेत्रातील हॉटेल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत विशेष संयुक्त बैठक घेण्यात आली. यामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना आणि रोजगार मेळाव्यांची माहिती देण्यात आली. या उपक्रमात हॉटेल असोसिएशनचे सचिव रमेश कौल, सहाय्यक आयुक्त अ. मु. पवार व लिपिक टंकलेखक का. रा. पालवे यांनी सहभाग घेतला.





