लोणंदच्या नगराध्यक्षपदी मधुमती पलंगे (गालिंदे ) तर उपनगराध्यक्षपदी शिवाजीराव शेळके-पाटील यांची निवड

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.११ फेब्रुवारी २०२१ । लोणंद । लोणंद नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मधुमती पलंगे (गालिंदे ) यांची दहा विरूद्ध सात मताने निवड झाली तर उपनगराध्यक्ष म्हणून राष्ट्रवादीच्याच शिवाजीराव शेळके-पाटील यांचीही दहा विरूद्ध सात मताने निवड करण्यात आली.

आज झालेल्या नगराध्यक्ष- उपनगराध्यक्ष पदाच्या निवड प्रक्रियेत अपेक्षेप्रमाणेच दहा नगरसेवक असलेल्या राष्ट्रवादीने दोन्ही पदावर आपलेच उमेदवार निवडून आणण्यात यश मिळवून लोणंद नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकावला.

नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीकडून प्रभाग क्रमांक सात मधून निवडून आलेल्या मधुमती पलंगे(गालिंदे ) यांचा अर्ज दाखल करण्यात आला होता त्यांच्या अर्जावर सूचक म्हणून राष्ट्रवादीचे रवींद्र क्षीरसागर तर अनुमोदक म्हणून राष्ट्रवादीच्याच नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेल्या दुसऱ्या उमेदवार सीमा वैभव खरात यांनी सह्या केल्या होत्या. तर काँग्रेसकडून अर्ज दाखल केलेल्या दिपाली निलेश शेळके यांच्या अर्जावर सूचक म्हणून प्रविण व्हावळ यांची तर अनुमोदक म्हणून आसिया बागवान यांनी सही केलेली.

आज लोणंद नगरपंचायतच्या सभागृहात प्रांत शिवाजीराव जगताप आणि प्रभारी मुख्याधिकारी संजय गायकवाड यांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीसाठी विषेश सभेला सुरवात झाली यामधे राष्ट्रवादीच्या उमेदवार मधुमती पलंगे यांनी दहा मते मिळवत बाजी मारली तर विरोधात असलेल्या काँग्रेसच्या उमेदवार दिपाली निलेश शेळके यांना सात मते पडली. तर उपनगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीकडून शिवाजीराव शेळके यांनी भाजपच्या उमेदवार दिपाली संदिप शेळके यांचा दहा विरूद्ध सात अशा मतांनी पराभव केला. या निवडीवेळी सभागृहात भरत शेळके,रविद्र क्षीरसागर, सचिन शेळके, गणीभाई कच्छी, भरत बोडरे, सुप्रिया शेळके, सीमा खरात, राशिदा इनामदार, प्रविण व्हावळ, आसिया बागवान, तृप्ती घाडगे, राजश्री शेळके, ज्योती डोनीकर आदी नगरसेवक उपस्थित होते.

सध्या लोणंद नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक दहा नगरसेवक आहेत तर भाजपा आणि काँग्रेसचे प्रत्येकी तीन नगरसेवक असून एक अपक्ष नगरसेवक असे बलाबल आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्याच उमेदवारांची नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदी वर्णी लागणार हे जवळपास निश्चित मानले जात होते. आज झालेल्या निवडीनंतर नवनिर्वाचित नगराध्यक्ष मधुमती पलंगे (गालिंदे) व उपनगराध्यक्ष शिवाजीराव शेळके-पाटील यांचे विधानपरिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर जननायक आमदार मकरंद पाटील, डाॅक्टर नितीन सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष दयानंद खरात, लोणंद शहराध्यक्ष विनोद क्षीरसागर, आदींनी अभिनंदन केले.

आ. मकरंद पाटील- लोणंद मधील जनतेने जो राष्ट्रवादी पक्षावर एकहाती सत्ता देत विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला राष्ट्रवादीकडून तडा जाऊ दिला जाणार नाही. तसेच राष्ट्रवादीच्या दहा नगरसेवकांच्या वतीने लोणंदमधील जनतेचे जाहीर आभार व्यक्त करत असल्याचे सांगितले. लोणंद शहरातील पाण्याची समस्या, घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न, बंदिस्त गटार, रहीवाशी जागेचा प्रश्न या प्रमुख समस्यांवर येणाऱ्या काळात उपाययोजना करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून केला जाईल. तसेच निवडणुक पुर्व काळात सत्तावीस टक्के एवढी वाढीव घरपट्टी करण्यात आली आहे. त्यातूनही सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.


Back to top button
Don`t copy text!