मधुकर उर्फ अण्णा देशपांडे


 

“किरण, तुमाला घेऊन मला एक पिच्चर काढायचाय.” तीन महिन्यांपूर्वी अण्णांची आणि माझी डाॅ. वाघ यांच्या दवाखान्यात भेट झाली तेव्हा ते म्हणाले… माझ्यासोबत माझे आईवडील होते. त्यांना अण्णा म्हणाले “पोरगं गुणी हाय तुमचं. त्याला चांगली संधी मिळाली तर सोनं करंल. मीच करतो त्याच्यासाठी कायतरी.” 

वाटलंही नाही की ही आमची शेवटची भेट ठरेल…

चित्रपट निर्माते आणि वितरक अण्णा तथा मधुकर देशपांडे म्हणजे सातार्‍याचे मनमोहन देसाई ! 

जत्रेतल्या तंबू थेटरच्या ग्रामीण शेतकरी वर्गातल्या प्रेक्षकांची कर्रेक्ट नस पकडलेला निर्माता… ‘तांबव्याचा विष्णू बाळा’ हा २८ लाखात बनवलेला सिनेमा… १० करोडचा व्यवसाय करून गेला !! यामागे फक्त आणि फक्त अण्णांचा ‘अभ्यास’ होता !!!

 ..सचिन-महेश कोठारे यांचा तो काळ होता. धुमधडाका-गंमत जंमत-एकापेक्षा एक-दे दणादण… मराठी सिनेमा किंचीत ‘शहराकडं’ वळला होता.. अस्सल ग्रामीण प्रेक्षकांसाठी सिनेमे करणारे अनंत माने-दादा कोंडके वगैरे मंडळी काळाच्या पडद्याआड गेली होती. त्याचवेळी अण्णांनी ती पोकळी भरुन काढली. ते चित्रपट निर्मितीत उतरले. ‘तांबव्याचा विष्णूबाळा’ नंतर अण्णांनी मागं वळून पाहिलं नाही. ‘सख्खा भाऊ पक्का वैरी’ ही सुपरडूपर हिट्ट झाला. मेहुण्यांचा अर्धवट पडून राहीलेला ‘जखमी कुंकू’ नांवाचा सिनेमाही अण्णांनी विकत घेतला आणि त्यात काही बदल करून रिशूट करून तुफान चालवला ! लै जिगरबाज निर्माता !! महाराष्ट्रात असणारी सगळी ‘तंबू सिनेमा सेंटर्स’ अण्णांच्या मेंदूच्या काॅम्प्यूटरमध्ये फिट्ट होती. पिच्चरचं नांव काय असावं इथपासून ते कुठल्या सेंटरसाठी किती पोस्टर्स छापायची-ती कुठं चिकटवायची-रिक्षा कुठं फिरवायची-कुठल्या दिवशीपासुन पिच्चर ‘धरतं’ याची गणितं अण्णांच्या मेंदूत पर्रर्रफेक्क्ट असायची ! 

…अण्णा कट्टर शिवसैनिक ! बाळासाहेब ठाकरेंवर अतोनात प्रेम..बाळासाहेब म्हणजे ‘जीव’ !! अण्णांच्या जुन्या ॲम्बेसिडरमध्ये एकदा बाळासाहेब बसले होते. ती आठवण म्हणून त्यांनी ती ॲम्बेसिडर कधीही विकली नाही. तशीच जपून ठेवली. आजपर्यन्त.

आमच्या शेवटच्या भेटीत, त्यांच्या मुलानं-दिनेशनं निर्मिती केलेला ‘बेभान’ सिनेमा त्यानं लवकर रिलीज करावा म्हणून माझ्याजवळ ते कळकळीनं बोलले.. मला म्हणाले ‘तुमीच बोला त्याच्याशी. तुमचं ऐकंल.’ आणि फोन लावून दिला… वाटलंही नाही की ते पुन्हा कधीच भेटणार नाहीत !

दिनेश-महेश त्यांचा वारसा नक्कीच चालवतील यात शंका नाही.

किरण माने.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!