नीरा-देवघरचे प्रकल्पाचे पाणी माढा लोकसभा मतदारसंघाला कायमस्वरूपी मिळणार; केंद्राकडून ६० टक्के निधीची उपलब्धता

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. ७ डिसेंबर २०२३ | फलटण |
माढा लोकसभा मतदारसंघाला नीरा-देवघरचे प्रकल्पाचे पाणी कायमस्वरूपी मिळण्यासाठी निधी कमी पडू नये म्हणून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष प्रयत्नांमुळे केंद्रीय जलसंपदामंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी या प्रकल्पाला अंतिम तांत्रिक मंजुरी देऊन या प्रकल्पातील ६० टक्के निधी उचलला आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे पाणी आता भोर, फलटणसह पंढरपूरला मिळणार आहे, अशी माहिती माढ्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी दिली आहे. केंद्रीय जलसंपदामंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी पंढरपूरला पाणी देणार असल्याचा आपला शब्द पाळल्याचेही खासदार रणजितसिंह यांनी यावेळी सांगितले.

याबाबत केंद्रीय जलसंपदामंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी म्हटले आहे की, नीरा-देवघर ही पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाची जलयोजना असून या योजनेमुळे भोर, खंडाळा, फलटण, पंढरपूर आणि सांगोला या माढा मतदारसंघातील लाखो एकर जमिनीच्या सिंचनाचा तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटू शकतो. मात्र, या योजनेच्या हायड्रोलॉजीचा मागील सरकारने जाणूनबुजून चुकीचा मार्ग काढला होता. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सरकारची स्थापना झाल्यानंतर माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या आग्रहामुळे या योजनेच्या हायड्रोलॉजीचे पुन्हा सर्वेक्षण केले. त्यामुळे आता या योजनेला पुढील कामासाठी केंद्राच्या जलसंपदा खात्यातून निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आता या परिसरातील भोर पासून पंढरपूरपर्यंत लाखो एकर जमिनीला शेतीसाठी व पिण्यासाठी पाणी कायमस्वरूपी उपलब्ध होणार आहे. ही योजना मार्गी लागावी म्हणून केलेले प्रयत्न खरेच कौतुकास्पद आहेत, त्यांचे मी अभिनंदन करतो, असेही मंत्री शेखावत यांनी म्हटले आहे.

या योजनेच्या मंजुरीबाबत बोलताना खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय जलसंपदामंत्री गजेंद्रसिंह शेखावत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या सर्वांचे मी आज आभार मानतो. नीरा-देवघरचे पाणी गेल्या २० वर्षांपासून माढा लोकसभा मतदारसंघाला मिळत नव्हते. ते आता कायमस्वरूपी मिळणार आहे. मी व केंद्रीय जलसंपदामंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी नीरा देवघर प्रकल्प स्थळापासून ते पंढरपूरपर्यंत पाहणी करून या प्रकल्पाचे पाणी कसे पंढरपूरपर्यंत कायमस्वरूपी देता येईल, यासाठी या प्रकल्पाची पुन्हा तांत्रिक सर्व्हेक्षण केले आणि आज त्यास जलसंपदा खात्याने फायनल मंजुरी देऊन या मतदारसंघातील जनतेला दिलेला शब्द पाळला.

आजपर्यंत माढा लोकसभा मतदारसंघातील भोर, माळशिरस, खंडाळा, पंढरपूर व सांगोला येथील जनता दुष्काळाच्या छायेत जगत होती. मात्र, २०२४ संपेपर्यंत या मतदारसंघातील जनता दुष्काळमुत होईल, अशी मला खात्री आहे. १२.९८ टीएमसी पाणीसाठवण क्षमता असलेला नीरा-देवघर प्रकल्प खर्‍या अर्थाने आज माढा लोकसभा मतदारसंघातील जनतेसाठी खुला झाला आहे. त्यामुळे स्व. हिंदूरावजी नाईक निंबाळकर व माझा गेल्या २० वर्षांपासूनचा संघर्ष यशस्वी झाला आहे. मी भारतीय जनता पार्टी, शिवसेना व राष्ट्रवादी सरकारचे या मतदारसंघातील जनतेच्या वतीने आभार मानतो.


Back to top button
Don`t copy text!