कार्यतत्पर आणि मनमिळाऊ सहकारी गमावला – काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची श्रद्धांजली

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य । दि. ०३ डिसेंबर २०२१ । मुंबई । विधिमंडळातील व काँग्रेस पक्षातील सहकारी, कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या आकस्मित निधनाचे वृत्त अत्यंत वेदनादायी असून आपण एक कार्यतत्पर आणि मनमिळाऊ सहकारी गमावला आहे, अशा शोकभावना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केल्या आहेत.

श्री. थोरात म्हणाले की, अत्यंत, शांत, संयमी, मनमिळाऊ स्वभाव असणारे चंद्रकांत जाधव कायम कोल्हापूरच्या विकासासाठी आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कार्यरत होते. कोरोनाच्या संकटकाळात आपला जीव धोक्यात घालून त्यांनी जनतेची सेवा केली. त्यांना दोन वेळा कोरोनाची लागण झाली आणि त्यांची प्रकृती खालावत गेली. उद्योगांच्या अनेक समस्या त्यांनी सरकारकडे पाठपुरावा करून सोडवल्या. कोल्हापूर शहराच्या विकासाबाबत ते कायम आग्रही होते. एक यशस्वी उद्योजक ते लोकप्रिय प्रतिनिधी असा त्यांचा प्रवास राहिला आहे. कोल्हापूरच्या राजकीय, सामाजिक, औद्योगिक, कला आणि क्रीडा क्षेत्रात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाली आहे.

आमदार चंद्रकांत जाधव यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून आम्ही जाधव कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत असे श्री.थोरात म्हणाले.

Back to top button
Don`t copy text!