तालुक्याची गती पाहता खा.रणजितदादांना पाठीबा : राम निंबाळकर


दैनिक स्थैर्य | दि. 03 मे 2024 | फलटण | फलटण तालुक्यातील विकासाची गती पाहता खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना आपला पाठींबा असल्याचे निंबळक (ता.फलटण) येथील प्रसिद्ध उद्योजक राम निंबाळकर यांनी जाहीर केले. दरम्यान; राम निंबाळकर यांच्या निर्णयाच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केला.

माढा लोकसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर राम निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘रामालय’ या निवासस्थानी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निंबळक ग्रामस्थांसह फलटण नगर परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर उपस्थित होते.

याप्रसंगी राम निंबाळकर यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, ‘‘फलटण तालुक्यासह माढा मतदारसंघाचा ‘न भूतो न भविष्यति’ असा सर्वांगीण विकास खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केला आहे. हजारो कोटी निधी आणून निरा देवधर बंदिस्त नलिकेव्दारे पाणी शेतकर्‍यांच्या बांधापर्यंत येत आहे. फलटण तालुका कायमचा दुष्काळमुक्त होतोय. आत्ताचा दुष्काळ हा तालुक्याच्या भाग्यातील शेवटचा दुष्काळ आहे.’’

‘‘खा.रणजितसिंह यांनी फलटण पंढरपूर रेल्वे, फलटण बारामती रेल्वे, फलटण पुणे रेल्वे, पालखी महामार्ग, जलजीवन मिशन, जिल्हा सत्र न्यायालय, आरटीओे ऑफिस, नाईकबोमवाडी एमआयडीसी, तालुक्यातील छोटे मोठे विविध रस्ते, सभामंडप, पथ दिवे यांसारखी अनेक विकास कामे केली आहेत. त्यामुळे फलटणची अस्मिता दिल्लीत सन्मानाने खा.रणजितसिंह यांच्या रुपाने उभी करूयात’’, असेही आवाहन राम निंबाळकर यांनी यावेळी केले.

‘‘तालुक्यातील प्रस्थापिक राजकीय व्यवस्थेला 30 वर्षात जे करता आले नाही ते खा.रणजितसिंहांनी अवघ्या 3 वर्षात केले आहे. माढा, करमाळा, सांगोला, माण – खटाव खा.रणजितसिंहांदा मताधिक्य देईल पण फलटणकर म्हणून त्यांना जास्तीत जास्त मताधिक्य देणे हे आपले कर्तव्य आहे. आपल्या मातीसाठी काम करणार्‍या आपल्या माणसाला अभिमानाने, स्वाभिमानाने दिल्लीत पाठवण्यासाठी त्यांना भरघोस मतांनी विजयी करा’’, असे आवाहनही राम निंबाळकर यांनी यावेळी केले.


Back to top button
Don`t copy text!