दैनिक स्थैर्य | दि. २६ मार्च २०२४ | फलटण |
निंबोडी (ता. खंडाळा, जि. सातारा) येथील १७ वर्षांच्या मुलास दि. २५ मार्च २०२४ रोजी कोणीतरी अज्ञाताने पळवून नेल्याची तक्रार लोणंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्याच्या नातेवाईकांनी दाखल केली होती. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक शिवाजी काटे यांच्याकडे होता. त्यांनी या अपहरण झालेल्या मुलाचा शोध तीन तासात लावून त्या मुलास सुखरूप त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, लोणंद पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि सुशील भोसले यांनी पोलीस उपनिरीक्षक शिवाजी काटे यांना तपासाच्या सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक काटे यांनी पीडित अपहृत मुलाची गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती प्राप्त करून वेळ न घालवता होमगार्ड अमर सूळ यांना सोबत घेऊन तीन तासात पुणे येथील कात्रज येथून अपहरण झालेल्या मुलास ताब्यात घेतले व त्यास लोणंद पोलीस ठाण्यात आणून सुखरूप त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिले.