साहित्यप्रेमी यशवंतराव चव्हाण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचे संवर्धन होण्यासाठी या क्षेत्राची मनापासून आवड असलेल्या यशवंतराव चव्हाणांची राजकारणाशिवाय एक साहित्यप्रेमी, रसिक वाचक व प्रभावी लेखक अशी दुर्मिळ ओळख महाराष्ट्राला आहे. त्याचा हा संक्षिप्त आढावा त्यांच्या ४० व्या पुण्यतिथीनिमित्त….

मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीशी अतूट नाते

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची धग, नव्याने निर्माण झालेल्या महाराष्ट्र राज्यातील विरोधी पक्षांचे आव्हान आणि महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षातील अंतर्गत संघर्ष याला तोंड देत यशवंतरावांनी १ मे १९६० रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून सूत्रे हाती घेतली. एक समाजचिंतनशील व साहित्यिक मनाचे राजकारणी म्हणून नव्या महाराष्ट्राकडे ते पाहत होते. राज्याची भौतिक प्रगती, कृषि, औद्योगिक, समाजवादी रचना, सहकार, शिक्षण, पाटबंधारे, उद्योग, महसूल अशा विविध खात्यांचा कारभारी शोधत समतोल मंत्रिमंडळाचे आव्हान ते पेलत होते. राज्य मराठी माणसांचे झाले, पण तो मराठी माणूस संवेदनशील, सुसंस्कृत विचाराचा घडविणे हेही तेव्हढेच महत्त्वाचे आहे असे यशवंतरावांचे मन त्यांना सांगत होते. लहानपणी आजीच्या, आईच्या मांडीवर पहाटे डोके टेकवत असलेले यशवंतराव या दोघींच्या तोंडून ग्रामीण लयीतल्या ओव्या ऐकत असत. शब्द कळत नसले तरी त्याची लय मराठी माणसांची संस्कृती आहे एव्हढे समजत होते. त्यामुळेच राज्याची सूत्रे हाती घेतल्यावर ५-६ महिन्यातच त्यांनी मराठी भाषा व साहित्य यांच्या अभिवृद्धीसाठी महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाची १९ नोव्हेंबर १९६० रोजी घोषणा केली. त्याचे उद्घाटन त्यांनीच नागपूर येथे २२ डिसेंबर १९६० रोजी केले. त्यावेळी बोलताना ते स्पष्टपणे म्हणाले होते, “राज्यस्थापनेच्यावेळी शासनाच्या संभाव्य धोरणासंबंधीचे मी जे वक्तव्य केले होते, त्यामध्ये साहित्य आणि संस्कृती यांच्या वृद्धी व संवर्धनासाठी विद्वत्जनांची एक यंत्रणा निर्माण करण्याचा हेतू प्रथमच जाहीर करुन महाराष्ट्राशी मी वचनबद्ध झालो होतो. त्यामुळे राज्यनिर्मितीनंतर घडणारी ही एक महत्त्वाची घटना आहे असे मी मानतो.” मराठी भाषा, साहित्य व संस्कृतीची थोरवी सांगताना ते पुढे असेही म्हणाले होते की, “या कार्याच्या बाबतीत या मंडळावर किंवा त्याच्या विचारांवर सरकार कुठलेही बंधन घालू इच्छित नाही.”

मराठी भाषेला नुकताच केंद्र सरकारकडून (दि. ४ ऑक्टोबर २०२४) अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. त्या पार्श्वभूमीवर यशवंतरावांच्या साहित्यावर, त्यांच्या साहित्यिक भूमिकेवर पुन्हा विचार करुन त्या विचारांचे जागरण करणे गरजेचे आहे. राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे पहिले अध्यक्ष थोर विचारवंत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी होते. त्यांनी या मंडळामार्फत मराठी विश्वकोशाचे आणि अनेक साहित्यिकांचे लेखन, संशोधन ग्रंथरुपाने प्रसिद्ध केले. त्यानंतर १ डिसेंबर १९८० रोजी या मंडळाचे विभाजन झाले. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष तर्कतीर्थच झाले आणि पहिल्या पुनर्रचित महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष प्रसिद्ध तत्त्वज्ञ डॉ.सुरेंद्र बारलिंगे झाले. आजही ही दोन्ही मंडळे चांगल्या पद्धतीने कार्यरत आहेत. पण या मंडळाच्या सदस्य, पदाधिकारी निवडीमध्ये गेल्या १०-१५ वर्षापासून राजकीय हस्तक्षेप वाढल्याचे प्रमाण दिसून येत आहे. तसेच या मंडळाला संपूर्णपणे स्वायत्तत्ता मिळण्याऐवजी यातील कारभारात प्रशासकीय हस्तक्षेपही वाढत गेला आहे. आज यशवंतराव असते तर त्यांनाही असे हस्तक्षेप आवडले नसते.

साहित्यिक यशवंतराव

विद्यार्थि दशेपासूनच स्वातंत्र्यचळवळीतील सहभागाबरोबर त्यांना पुस्तके वाचण्याची आवड होती. त्यातूनच त्यांचा संयमी व चिंतनशील स्वभाव घडत गेला. म्हणूनच राजकारणाच्या पलिकडचे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राला, मराठी साहित्य विश्वाला दिसले. त्यामुळे यशवंतराव चव्हाण माणूस आणि लेखक या भूमिकेतून त्यां नव्याने समजून घेणे आजही आवश्यक आहे.

यशवंतराव शालेय वयात कराडला असतानाच स्वातंत्र्य चळवळीचा काळ असल्यामुळे स्वातंत्र्य चळवळीत सामील झाले होते. या वयातच कवि यशवंत, गिरीश, केशवसूत, माधव ज्युलियन यांचे साहित्य त्यांना आवडत असे. विद्यार्थिदशेत तिरंगा ध्वज शाळेत फडकवल्याबद्दल त्यांना प्रथमच अटक झाली होती. त्याकाळातल्या लढ्यातील गीते, पोवाडे याकडेही ते आकर्षित झाले होते. १८ व्या वर्षीच पुन्हा त्यांना स्वातंत्र्यचळवळीतील सत्याग्रही म्हणून पुण्याच्या येरवडा तुरुंगात जावे लागले. त्यांची साहित्यिक, वैचारिक बैठक व राजकीय विचारसरणीची दिशा या तुरुंगातच तयार होत चालली होती. आचार्य भागवत तिथल्या अशा कैद्यांना अनेक ग्रंथांबद्दल माहिती देत असत. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे ‘कमला’ खंडकाव्य त्यांच्या मुखातून रसाळपणे ऐकण्याचे भाग्य यशवंतरावांना लाभले होते. त्यातून त्यांना काव्याबद्दलची आवड निर्माण झाली. तुरुंगातून बाहेर आल्यावर त्यांनी स्वत:च अनुष्टुभ छंदात ४०० ओवींची दीर्घ कविता लिहिली होती व एक कादंबरीही लिहिली होती. पण हे दोन्ही साहित्य अप्रकाशितच राहिले. पुणे आणि नंतर विसापूर तुरुंगात यशवंतरावांना अनेक क्रांतिकारक, देशभक्त स्वातंत्र्य सैनिकांचा, त्यांच्या नेत्यांचा सहवास लाभला होता. त्यामध्ये ह. रा. महाजनी, एस. एम. जोशी, आचार्य भागवत, सेनापती बापट यांचे चिरंजीव वामन बापट इत्यादिंचा समावेश होता. पुण्यात आणि विसापूर तुरुंगात या सगळ्यांच्याकडून मराठी साहित्याबद्दल आणि इंग्रजी वाड्मयाबद्दलही यशवंतरावांना ऐकायला मिळाले. त्यात कालिदासाचे शाकुंतल, शेक्सपिअरचा जूलीयस सीझर त्यांना ऐकायला मिळायचे. त्यातून इंग्रजी वाड्मयाचे वाचनही त्यांनी केले. त्यामध्ये बर्ट्राल रसेल यांचे ‘गेटस् टू फ्रीडम’, गांधीजी, लेनिन यांच्या जीवनावरची पुस्तके, जॉन रिड् यांचे ‘टेन डेज दॅट शुक द वर्ल्ड’ इत्यादि साहित्यांचा समावेश होता. हिंदी कम्युनिस्ट नेते मानवेंद्र रॉय यांच्याबद्दलचीही माहिती त्यांना डॉ. शेट्टी व ह. रा. महाजनी यांच्याकडून मिळाली. त्यामुळे हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचा प्रश्न केवळ हिंदुस्थानपुरता नाही. कांही अन्य देशांच्या स्वातंत्र्याचा प्रश्न अशी जागतिक किनार त्यांना समजली. एक झाले, यशवंतरावांनी या विषयाची अनेक पुस्तके वाचली. पुढे काही काळ तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचेमुळे त्यांचा मानवेंद्र रॉय यांच्या विचाराशी जवळीक निर्माण राहिली. रशियन राज्यक्रांतीचीही पुस्तके त्यांनी वाचली. या सर्वांमुळे त्यांना चौफेर वाचनाची सवय झाली आणि त्यातून त्यांचे वाड्मयीन व्यक्तिमत्त्व तयार झाले.

महाराष्ट्राचा साहित्यिक व सांस्कृतिक परिघ वाढवला

तुरुंगवास, शालेय शिक्षण, नंतर महाविद्यालयीन शिक्षण, त्यानंतर स्वातंत्र्य चळवळीतील पुन्हा सक्रीय सहभाग, १९४६ चे मुंबई इलाख्याचे कायदेमंडळ ते द्वैभाषिक गुजरात महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील १९५२ पर्यंतचा विधीमंडळ राजकीय प्रवास व पहिले अन्न व नागरी पुरवठा मंत्री, नंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे चिटणीस, १९५६ साली द्विभाषिक मुंबई राज्याचे मुख्यमंत्री, १९५७ संयुक्त महाराष्ट्राच्या धगीतही कराडमधून काँग्रेसतर्फे आमदार व पुन्हा मुख्यमंत्री, त्याच काळात प्रतापगडावर मालोजीराजे नाईक निंबाळकर यांच्या सहकार्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारुढ पुतळा व त्याचे पंतप्रधान पंडित नेहरु यांच्या हस्ते अनावरण, अखिल भारतीय काँग्रेसच्या वर्किंग कमिटीवर निवड, १ मे १९६० रोजी मराठी अस्मितेचा आवाज म्हणून स्थापन झालेल्या नव्या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, पंडित नेहरुंच्या विश्वासामुळे केंद्रीय संरक्षण मंत्री, नंतर गृहमंत्री, अर्थमंत्री, परराष्ट्रमंत्री, लोकसभेतील विरोधी पक्षनेते, चरणसिंग मंत्रिमंडळात भारताचे उपपंतप्रधान व गृहमंत्री, आठव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष असा त्यांचा राजकीय प्रवास सर्वांनाच ज्ञात आहे.

त्यात नव्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यावर आधी उल्लेख केल्याप्रमाणे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मराठी विश्वकोश मंडळ, लोकसाहित्य निर्माण समिती, रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षक मंडळ, भाषा विभाग, शासकीय परिभाषा कोश व पदनाम कोश निर्माण समिती, ग्रंथालय व ग्रंथप्रसारासाठी अनुदान, हे प्रकल्प त्यांनी यशस्वीरित्या सुरु केले. यातून त्यांनी महाराष्ट्राचा सांस्कृतिक व साहित्यिक परिघ आगळ्यावेगळ्या वैशिष्ठ्यासह वाढविला. ग्रंथाची, वाचनाची मुळातच अभिरुची असल्यामुळे ज्येष्ठ व श्रेष्ठ मराठी साहित्यिक, नवे दलित व दलितेतर तरुण साहित्यिक, प्रसिद्ध मराठी, इंग्रजी वृत्तपत्रांचे संपादक, नाट्य व चित्रपट, नृत्य, संगीत, तमाशा यातील बुजुर्ग कलावंत असा एक परिघच, त्यांनी स्वत:च्या रसिक व्यक्तिमत्त्वाभोवती गुंफला हे त्यांचे खास वैशिष्ट्य आहे. त्यामध्ये तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, ग. दि. माडगूळकर, सरोजिनी बाबर, वसंत बापट, पु. ल. देशपांडे, ना. सी. फडके, वि. स. खांडेकर, कुसुमाग्रज, जयवंत दळवी, रणजित देसाई, ना. धों. महानोर, कवि ग्रेस, रावसाहेब पटवर्धन, कवि यशवंत, ग. त्र्यं. माडखोलकर, नरुभाऊ लिमये, गोवर्धनदास पारीख, गोविंद तळवळकर, ह. रा. महाजनी, नव्या पिढीतील दया पवार, नामदेव ढसाळ, लक्ष्मण माने, रामदास फुटाणे अशी कितीतरी शेकडों व्यक्तिमत्त्वे होती. उद्योग क्षेत्रातील भाऊसाहेब नेवाळकर, शंतनुराव किर्लोस्कर, वसंतराव वैद्य, आबासाहेब गरवारे, नीळकंठराव कल्याणी, म्हादबा मेस्त्री, बजाज, फिरोदिया यांसारखीही अनेक कर्तृत्त्ववान माणसे या परिघात होती. संगीत क्षेत्रातील लता मंगेशकर, कुमार गंधर्व, हिराबाई बडोदेकर, भीमसेन जोशी यांचे सहवास म्हणजे चंदेरी मैफिल असे यशवंतराव म्हणत असत. यांच्यापैकी काही जणांच्या मैफिली त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी त्यांनी आयोजित केल्या होत्या.

पत्रातूनही साहित्यिक यशवंतराव दिसतात

आजकाल मोबाईल, चॅटिंग, फेसबुक व इतर समाजमाध्यमे यामुळे वैयक्तिक पत्रव्यवहार जवळजवळ नामशेषच झाला आहे. पण यशवंतरावांनी आपली पत्नी, मित्र, लेखक, उद्योगपती, कलाकार, संगीत, नाट्य, कला, क्रीडा आणि राजकारण, शिक्षण, समाजकारण इत्यादि क्षेत्रातील अनेक मान्यवरांशी जो पत्रव्यवहार केला आहे, तो साहित्यिक व व्यक्तिगत जवळिकीची एक संस्कृती म्हणून कराड येथील त्यांच्या निवासस्थानी ‘विरंगुळा’ मध्ये कृतज्ञतापूर्वक जतन केलेली आहेत. त्यातून आपल्याला यशवंतराव माणूस व लेखक या दोन्ही रुपात भेटतात. हा सारा पत्रव्यवहार म्हणजे त्यांच्या मर्मबंधातील ठेव आहे असे ते मानतात. जवळपास १ लाख ४ हजार ९५२ पत्रांचा हा विलक्षण पत्रसंग्रह त्यांच्या अनुबंध समूहाचा साक्षीदार आहे.

देशात आणि परदेशात मंत्री म्हणून यशवंतराव जात होते. शासकीय काम झाल्यानंतर तिथे पर्यटन करताना, अनेक संग्रहालये, ग्रंथालये, पुस्तकांची दुकाने पाहणे हा एक त्यांचा मनसोक्त छंद होता. हे सारे पाहत असताना तिथली वैशिष्ठ्ये, भेटलेली माणसे, याबाबतच्या आठवणी ते आपली प्रिय पत्नी वेणूबाई (हे त्यांचं आवडतं नाव) यांना लिहून पाठवित असत. त्या सगळ्याच पत्रातून त्यांची चौफेर निरीक्षण वृत्ती, रसिकता, निसर्गाचा मोहकपणा, तिथल्या संस्कृती, चालीरिती याचे मनोज्ञ दर्शन पानापानांतून दिसून येते. प्रवास वर्णनाचा हा एका अनोख्या साहित्याचा एक वेगळाच अविष्कार आहे. पण तत्कालीन साहित्यविश्व व वृत्तपत्रे यांनी याची कां दखल घेतली नाही हे एक कोडेच आहे. हा पत्रसंग्रह त्यांचे स्नेही रामभाऊ जोशी यांनी विदेश दर्शन, स. मा. गर्गे यांनी पत्रसंवाद व पुन्हा रामभाऊ जोशींच्या ‘विरंगुळा’ यातून शब्दबद्ध झाला आहे.

‘कृष्णाकाठ’ हा त्यांच्या आत्मचरित्राचा पहिला खंड १९८४ मध्ये पत्नी वेणूबाई यांच्या निधनानंतर प्रसिद्ध झाला. हे लेखन खूपच प्रवाही आहे. बालपणापासून ते १९४६ पर्यंतच्या आठवणींची ही रेशीम लगडच आहे. त्यांचे हे आठवणींचे संकलन म्हणजे त्यांच्या सुरुवातीच्या निरागस पण दरिद्री, शिक्षणाबद्दलची आस्था, निसर्गाचे चित्रण व भटकंती, सहवासात आलेल्या अगदी साध्यासुध्या व्यक्तिंची शब्दचित्रे, आई, आजी, चुलते, पत्नी, इतर भाऊबंद यांच्या आठवणी व नात्यातल्या अनुबंधाचे दर्शन, कौटुंबिक सुखदु:खाची सरमिसळ, राजकारण व स्वातंत्र्य चळवळीतील धग हे सारे वर्णन म्हणजे साहित्यिक फुलांची ओंजळच आहे. न. चि. केळकर पारितोषिक सोडले तर या एवढ्या मोठ्या आत्मकथनाची तत्कालीन साहित्यविश्वाने काहीच दखल घेतली नाही. खरं तर हे आत्मकथन व पत्रलेखनाचा संपादित संग्रह ‘विरंगुळा’ साहित्य अकादमी पुरस्कार मिळण्यायोग्य नक्कीच होता.

त्यांचे व त्यांच्यावरील अन्य विविध लेखनांचे संग्रह

‘ऋणानुबंध’ (१९७५), भाषणसंग्रह ‘विचारधारा’ (१९६०), ‘शिवनेरीच्या नौबती’ (१९६१), ‘सह्याद्रीचे वारे’ (१९६२), ‘युगांतर’ (१९७०), ‘भूमिका’ (१९७९), विधीमंडळातील निवडक भाषणे (१९८९), ‘रोजनिशी’ (१९६५), ‘पत्रसंवाद’ (२००२), ‘शब्दांचे सामर्थ्य’ (२००२) याशिवाय अनेक शेकडो लेखकांनी त्यांच्यावर पुस्तके लिहिली आहेत.

त्यांनी अनेक कवि, लेखक, कादंबरीकार, नाट्यलेखक यांना लिहिण्याबद्दल सतत प्रोत्साहन दिले होते. त्यांच्यामुळे उजेडात आलेले प्रतिभावंत शेतीतज्ज्ञ ना. धों. महानोर म्हणतात, “मराठवाड्यातील पळसखेडसारख्या जेमतेम हजार लोकवस्तीच्या गावात, या लहानशा खेड्यात पायवाटेने चालत यशवंतराव आले ते केवळ कवितेच्या ओढीपोटी आणि माझ्याशी माझ्या मतीप्रमाणेच कायमचा स्नेहबंध जोडून गेले आणि माझ्या घरभर दिवे लावून गेले.” साहित्य अकादमीच्या पुरस्कारापेक्षाही हा शब्दपुरस्कार फार मोठा आहे. अनेक मान्यवर साहित्यिकांच्या ग्रंथांना त्यांनी प्रस्तावना दिल्या आहेत त्यासुद्धा चिंतनशील अशा त्यांच्या लेखनाचा एक प्रवाही आविष्कार आहे. काही त्यांना आवडलेल्या पुस्तकांचे ते रसग्रहण वृत्तीने समीक्षणही करीत होतेे. ते त्यांच्या सातारा, पुणे जिल्ह्यात अगर राज्यात, देशात, परदेशात कोठेही असले तरी ते सतत नव्या लेखकाच्या, साहित्यकृतीच्या शोधात असतात. ‘उपरा’कार लक्ष्मण माने (सातारा) यांचे पहिलेच आत्मकथन वाचल्यावर त्यांच्या डोळ्यात दु:ख, व्यथा भरुन आल्या. ते लक्ष्मण माने यांना सातारला आल्यावर त्यांच्या घरी भेटायला गेले तेव्हा म्हणतात, “राजकारण, समाजकारण यात मी खूप मोठ्या पदावर गेलो, पण त्या उंचीवरुन खालती असलेल्या तुझ्या समाजाच्या वेदना मला कशा दिसल्या नाही याबद्दल मला अपराध्यासारखे वाटते”, असा हा एक परदु:ख सहिष्णुतेबद्दल हृदयात असलेल्या कळवळ्याचा हळव्या मनाचा साहित्यिक होता.

पण आज काय?

अशा या यशवंतरावांचे योग्य असे साहित्यिक स्मारक त्यांनीच उभ्या केेलेल्या महाराष्ट्रात अजून तरी नाही. त्यांना सर्वांगीण विचाराचा, प्रगतीचा, आत्मनिर्भर असा सर्वांचा महाराष्ट्र घडवायचा होता. त्यांच्यासारखा सुजाण, रसिकवाचक, हळव्या मनाचा साहित्यिक मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला नाही. महाराष्ट्रातल्या अनेक साहित्यिक संस्थांना, साहित्य महामंडळाच्या निर्मितीतून, शासकीय अनुदानातून उत्तेजन दिले आहे. अशा संस्थांतून तरी त्यांना त्यांच्या जयंती, पुण्यतिथीनिमित्त अभिवादन, पुण्यस्मरण तरी होते की नाही हे शोधावे लागेल. आजचे महाराष्ट्रातील फोडाफोडीचे, विश्वासघाताचे, पक्षच पळवापळवीचे राजकारण आणि त्याचे समर्थन करणार्या गलिच्छ राजकारण्यांच्या तावडीत महाराष्ट्र सापडला आहे. सत्तेतून पैसा आणि पैशातून पुन्हा सत्ता, येनकेनप्रकारे फक्त सत्ता मिळविणे एव्हढेच उद्दिष्ट असणारा सध्याचा महाराष्ट्र यशवंतरावांच्या विचारातून पूर्वीसारखा सुसंस्कृत आहे कां? याचे आत्मपरिक्षण सर्वच पक्षातील राज्यकर्त्यांनी करण्याची आणि त्या दिशेने राजकारण्यांची मने घडविण्याची साहित्यिकांची जाणीव समृद्ध होण्याची आज खरी गरज आहे.

यशवंतरावांनी निर्माण केलेल्या मराठी भाषा विभागातील सर्व संस्था निरपेक्ष व स्वायत्त आहेत कां याचाही विचार झाला पाहिजे. यातील सर्व संस्था, खरं तर ‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मराठी अकादमी’ स्थापन करुन त्याच्या एका छत्राखाली आणल्या पाहिजेत यासाठी राज्यातील भाषा, साहित्य, संस्कृतीशी संबंधित सर्वच संस्थांनी, साहित्यिकांनी प्रयत्न करणे व राज्यशासनानेही याबाबत सकारात्मक निर्णय घेणे हीच खरी यशवंतराव चव्हाणांच्या आजच्या पुण्यस्मरणदिनानिमित्त त्यांना सुयोग्य साहित्यिक कृतीशील अशी आदरांजली ठरावी अशी अपेक्षा आहे.

– रविंद्र बेडकिहाळ, फलटण.
मोबा. ९४२२४००३२१


Back to top button
Don`t copy text!