समाजात एकोपा येण्यासाठी साहित्यिकांनी अंतर्मुख होऊन लिखाण करावे !

नाना नानी पार्कमधील ‘साहित्यिक संवाद’ कार्यक्रमातील सूर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. १ जुलै २०२४ | फलटण |
आजचा समाज हा अती परिवर्तनाच्या वाटेवर आहे. मोबाईलच्या अतिरेकी वापरामुळे माणूस माणसापासून दूर गेला आहे. माणूस पैसा व संपत्ती याच्या हव्यासापायी काहीही करायला तयार आहे, त्यात छुपी व्यसनाधीनता वाढीस लागून द्वेष भावना वाढीस लागली असून तरुणाई बेभान होत आहे. त्यात तरुणाईला व्यसनांनी विळखा घातला आहे. ही बाब गंभीर आहे. मतभेदांमुळे मनभेद वाढून सामाजिक ऐक्य धोक्यात आले आहे, ही बाब चिंताजनक आहे. समाज परिवर्तन होवून समाजात एकोपा निर्माण व्हावा यासाठी साहित्यिकांनी अंतर्मुख होऊन लिखाण करावे. समाज परिवर्तनाच्या लढाईत साहित्यिकांचे योगदान महत्त्वाचे आहे, असा सूर हिरवाईने नटलेल्या नाना नानी पार्क, फलटण येथे थंडगार हवेत सायंकाळी रंगलेल्या साहित्यिक संवाद कार्यक्रमात प्रकर्षाने मांडला गेला.

साहित्यप्रेमी सेवाभावी फाऊंडेशन फलटण, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा फलटण, वन विभाग फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने ‘साहित्यिक संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दर महिन्याच्या २७ तारखेला या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

यावेळी ज्येष्ठ साहित्यिक सुरेश शिंदे म्हणाले की, साहित्यिकांनी सजग राहून समाजप्रबोधनपर लिखाण करून दुःख, वेदना यावर भाष्य करून दर्जेदार साहित्य निर्माण करावे तसेच लिखित साहित्य अधिक परिणामकारक ठरते.

कार्यक्रमाचे संयोजक व माणदेशी साहित्यिक ताराचंद्र आवळे म्हणाले की, साहित्यिकांनी समाजमनाचा अचूक वेध घेऊन समाज परिवर्तनाच्या वाटेवर आपली लेखणी व भूमिका स्पष्ट मांडावी. व्यसनाधीनता व तरुणाई यावर साहित्यिकांनी आपले विचार स्पष्ट मांडून चुकीला चूकच म्हणाले पाहिजे व समाज परिवर्तनाच्या लढाईत अग्रेसर असले पाहिजे.लिखाण करताना अवतीभवती जे घडते त्याचा अचूक वेध घ्यावा.

प्रा.सुधीर इंगळे यांनी तरुणाई व्यसनाकडे कशी आकर्षित होत आहे, त्यासाठी गावागावात यंत्रणा कशी तयार आहे, यावर स्पष्ट विचार मांडून जे हात राष्ट्र निर्मितीसाठी आहेत ते व्यसनात कसे गुंतले आहेत, हे सांगितले.

हरिराम पवार यांनी पूर्वी समाज प्रबोधन करण्यासाठी जी गाणी गायली जायची ती आज कशी गरजेची आहेत, हे सांगून गाणी गायली.

अ‍ॅड. रोहिणी भंडलकर यांनी व्यसनाधीनता यामुळे मुलामुलींची लग्न करताना येणार्‍या अडचणी, वाढती वये, शिक्षण, आईवडिलांच्या अवास्तव अपेक्षा तसेच त्यातून लग्न झाले तर व्यसनाधीनता यामुळे विभक्त राहण्याचे प्रमाण वाढले आहे, असे सांगितले.

युवा कवी अविनाश चव्हाण यांनी ‘दुःखाचा विसर’ ही कविता सादर करून दुःखाचा विसर व्हावा यासाठी व्यसन करण्यापेक्षा चांगली पुस्तके वाचून जीवनाला आकार द्यावा व सुखी समाधानी जीवन जगावे, असे सांगितले.

प्रास्ताविक व स्वागत माणदेशी साहित्यिक व कार्यक्रमांचे संयोजक ताराचंद्र आवळे यांनी केले तर आभार नितीन मदने यांनी मानले.


Back to top button
Don`t copy text!