मायबोलीच्या सोहळ्यात साहित्यिक आणि रसिकांनी सहभागी व्हावे – स्वागताध्यक्ष तथा पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १८ एप्रिल २०२२ । मुंबई । अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे, ९५वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दि. २२ ते २४ एप्रिल २०२२ या कालावधीत भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर साहित्यनगरी, महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, उदगीर, जिल्हा लातूर येथे होणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे हे संमेलनाचे अध्यक्ष आहेत. मायबोलीच्या या साहित्य संमेलनाला साहित्यप्रेमी, रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन स्वागताध्यक्ष तथा पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा बहुमान लातूर जिल्ह्याला प्रथमच लाभला आहे. “महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आयोजित या साहित्य संमेलनात मावळते संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर हे नियोजित संमेलनाध्यक्ष भारत सासणे यांना अध्यक्षपदाची सूत्रे प्रदान करतील. तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनात विविध कार्यक्रमांची मेजवानी रसिकांसाठी असणार आहे.

छत्रपती शाहू महाराज सभागृहात दि. २२ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १.३० वा. या दरम्यान डॉ. ना. य. डोळे व्यासपीठावर उद्घाटन सोहळा होईल. उद्घाटक ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार असून यावेळी प्रमुख पाहुणे दामोदर मावजो, माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, उद्योगमंत्री सुभाष देसाई, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख, पंडित हृदयनाथ मंगेशकर हे उपस्थित राहणार आहेत.

दि. २४ रोजी दुपारी ३.३० ते ५.०० या वेळेत होणाऱ्या समारोप समारंभास राष्ट्रपती रामनाथ कोविंद प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार असून यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, संमेलनाध्यक्ष भारत सासणे, पालकमंत्री अमित देशमुख, खासदार सुधाकर श्रृंगारे उपस्थित राहणार आहेत.

ग्रंथदिंडी, ग्रंथ प्रदर्शन हे संमेलनाचे विशेष आकर्षण ठरणार असून साहित्य विषयक परिसंवाद, चर्चासत्रे यांत नामवंतांना बघण्याची, ऐकण्याची संधी लातूरकर रसिकांना मिळणार आहे. संमेलनात आयोजित करण्यात आलेल्या विविध साहित्यिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद साहित्यप्रेमी, रसिकांनी मोठ्या प्रमाणावर घेण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

दि. २० एप्रिल रोजी येथील भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर साहित्यनगरीत सायं. ६.०० ते १०.३० या वेळेत प्रसिद्ध संगीतकार, गायक अजय-अतुल गोगावले आणि संचातर्फे ‘संगीत रजनी’ चे सादरीकरण करण्यात येणार आहे. तसेच दि. २१ एप्रिल रोजी सायं. ७ ते १०.३० वा. च्या दरम्यान ‘चला हवा होऊ द्या’ या विनोदी कार्यक्रमातील कलाकार कला सादर करणार आहेत.


Back to top button
Don`t copy text!