दैनिक स्थैर्य | दि. १० जुलै २०२४ | फलटण |
श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणचे श्री जानाई हायस्कूल व जुनिअर कॉलेज राजाळे येथे सोमवार, ९ जुलै २०२४ रोजी संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा-२०२४ निमित्त ‘साक्षरता दिंडी’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
प्रशालेच्या पर्यवेक्षिका श्रीमती काकडे मॅडम यांच्या हस्ते अश्व व पालखीमधील विठ्ठल- रुक्मिणी यांची मूर्ती व ग्रंथ यांचे पूजन केले. त्यानंतर दिंडी सोहळ्याला सुरुवात झाली. दिंडीत ‘ज्ञानेश्वर… माऊली… तुकाराम…’ यांच्या गजरात संपूर्ण गावात प्रदक्षिणा घालण्यात आली.
गावातील भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. राजाळे गावातील बाजार तळावर पालखीचे गोल रिंगण घेण्यात आले. यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी विठ्ठलनामाचा व माऊलींचा गजर केला तसेच विद्यार्थिनी व शिक्षिका यांनी सांप्रदायिक पद्धतीने फुगड्या खेळून आनंद व्यक्त केला.
या ठिकाणाहून दिंडी परत विद्यालयात आली. या दिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी विठ्ठल, रुक्मिणी, वारकरी यांचे वेश परिधान करून आनंद घेतला. तसेच साक्षरतेची जनजागृती केली. या साक्षरता दिंडीत विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या.