श्री संत कान्हुराज महाराज पालखी सोहळ्याचे गोखळी परिसरात भक्तीभावाच्या वातावरणात स्वागत


दैनिक स्थैर्य | दि. १० जुलै २०२४ | फलटण |
पुणे जिल्ह्यातील केंदूर (तालुका शिरूर) येथून निघालेल्या श्री संत कान्हुराज महाराज पालखी सोहळा केंदूर, कनेरसर, दावडी, आळंदी, पुणे, नसरापूर, शिरवळ, लोणंद, तरडगाव, फलटण, राजाळे, साठे, खटकेवस्तीमार्गे गोखळी येथे ज्ञानोबा तुकाराम अभंगाच्या, टाळमृदंग वाद्यांच्या गजरात आगमन होताच मोठ्या उत्साहाने, भक्तीभावाने या पालखीचे स्वागत करण्यात आले.

संत कान्हुराज महाराज वारकरी संप्रदायातील थोर संत होते. कान्होपाठक सिध्दयोगी होते. म्हणून संत ज्ञानेश्वर समाधीवेळी संत नामदेव यांना दुःखाचा गहिवर आवरेना, त्यामुळे ते कीर्तन करू शकले नाहीत. तेव्हा सर्व संतांनी ज्ञानेश्वरांच्या समाधीचे कीर्तन संत कान्हुराज महाराज पाठक यांना करायला लावले.

संत कान्हुराज महाराज पालखी सोहळ्याचे हे ४९ वे वर्षे असून दिवसांदिवस पायी पालखी सोहळ्यात वारकर्‍यांची लक्षणीय संख्येने वाढ होत आहे. यावर्षी २० ट्रक ४ पाण्याचे टँकर आणि चारचाकी ७ वाहने असे सुमारे २ हजार वारकरी सहभागी झाले आहेत.

खटकेवस्ती, गोखळी येथे दुपारी पालखी सोहळ्याचे आगमन होताच ग्रामस्थांनी या सोहळ्याचे मोठ्या उत्साहाने स्वागत करून संत कान्हुराज महाराज पालखी ज्ञानोबा तुकाराम महाराजांच्या गजरामध्ये सभामंडपामध्ये ठेवण्यात आली. यावेळी गोखळी, खटकेवस्ती, पंचबिगा, मेखळी, घाडगेवाडी (तालुका बारामती) येथील भाविकभक्तांनी दर्शनासाठी मोठी रांग लावली होती.

गोखळी ग्रामस्थांच्या वतीने पालखी सोहळ्यातील वारकर्‍यांसाठी सुविधा पुरविण्यात आल्या होत्या. गोखळी आरोग्य उपकेंद्रातील आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स यांच्या वतीने वारकर्‍यांची आरोग्य तपासणी, औषध व गोळ्या वाटप, बिस्किटे, पाणी बॉटल, पावसाळी रेनकोट आणि महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. तसेच वन लाईफ जिमच्या वतीने आलेल्या वारकर्‍यांचे मसाज करण्यात आले.

दुपारी ४ वाजता संत कान्हुराज महाराज पालखीचे पवारवाडी, ता. फलटण येथील मुक्कामासाठी प्रस्थान झाले. पवारवाडी मुक्कामानंतर शिंदेवाडीमार्गे फोंडशिरसमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये हा पालखी सोहळा सहभागी होणार आहे.


Back to top button
Don`t copy text!