दैनिक स्थैर्य | दि. २६ मार्च २०२४ | फलटण |
बेकायदा दारू विक्री प्रकरणी फलटण ग्रामीण पोलिसांनी फलटण तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईत एका दाम्पत्यासह चौघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून देशी दारूच्या बाटल्यांसह एकूण सुमारे ८८४० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पिंपरद येथील रोहित सिकंदर भोसले (वय २५) व विडणी येथील दाम्पत्य सुशील सुरेश जगताप व वृषाली सुशील जगताप व अमित बाळासाहेब जगताप यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, दि. २५ मार्च २०२४ रोजी पिंपरद, तालुका फलटण गावच्या हद्दीत आरोपी रोहित सिकंदर भोसले (वय २५, राहणार पिंपरद) हा बेकायदा देशी दारूची चोरटी विक्री करत होता. त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडून पोलिसांनी देशी दारूच्या ४९ बाटल्यांसह एकूण १७१५/- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.
दुसर्या ठिकाणी दि. २५ मार्च २०२४ रोजी विडणी (तालुका फलटण) गावचे हद्दीत कॅनल पुलाजवळील नाळे वस्ती येथे वृषाली सुशील जगताप व सुशील सुरेश जगताप हे दाम्पत्य आपल्या घराच्या आडोशाला स्वतःच्या आर्थिक फायदाकरीता देशी विदेशी दारूच्या बाटल्या बेकायदेशीरपणे जवळ बाळगून त्यांची लोकांना विक्री करून पैसे स्वीकारत असताना मिळून आले. त्यांच्याकडून पोलिसांनी देशी दारूच्या २१ सीलबंद बाटल्यांसह एकूण १७३५/- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
तिसर्या ठिकाणी दि. २५ मार्च २०२४ रोजी विडणी (तालुका फलटण) गावचे हद्दीत बौद्धनगर येथे असलेल्या घराच्या आडोशाला आरोपी अमित बाळू जगताप (राहणार विडणी) हा बेकायदा देशी-विदेशी दारूची चोरटी विक्री करीत असताना मिळून आला. त्याच्याकडून पोलिसांनी सुमारे ५५९०/- रूपयांचा माल जप्त केला आहे.
वरील सर्व गुन्ह्यांचा तपास फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस फौजदार हांगे करत आहेत.