एक अनुभव गडचिरोली कॅम्पचा…

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

गेल्या महिन्यात म्हणजे १ ऑक्टोबर रोजी आम्ही सारे टीमसह गडचिरोली येथे आयोजित केलेल्या ‘फ्री सर्जरी कॅम्प’साठी रवाना झालो. मी नेहमी सांगतो की, हा कॅम्प म्हणजे गडचिरोली तीर्थयात्रा असते. आमचे कर्मयोगी डॉक्टर अभय आणि राणी बंग (विठ्ठल-रखुमाई) यांचे दर्शन होते. प्रत्येकवेळी नवीन विचार, आनंद, अमृत आणि एनर्जी घेऊन आम्ही आपापल्या घरी परत येतो. आम्ही म्हणजे एक टीम. surgeons, gynaecologists, anasthesialogist, urosurgeon, plastic surgeons, assistants साधारणपणे १८ जण असतो. गडचिरोली येथे जाण्याचे हे एकविसावे वर्ष. दरवर्षी दोन वेळा. मार्च आणि सप्टेंबर.

यंदाही आम्ही सगळ्यांनी मिळून ऑक्टोबर कॅम्पमध्ये विविध प्रकारची जवळपास ९० ऑपरेशन केली. त्यातील ८० टक्के major operations होती. “Surgical strike ” संपल्यानंतर ‘जंगल सफारी’ असतेच. यावेळी आम्ही चंद्रपूरला प्राचीन वाडे, देवळे पहायला गेलो होतो. ५ ऑक्टोबर रोजी आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. संध्याकाळी उशिरापर्यंत सारे जण आपापल्या घरी पोहोचले.

नंतरही ‘सर्च’मधून मला रोज नियमितपणे फोन येत होते. सर्व रुग्ण stable होते.
अचानक १२ ऑक्टोबरला फोन आला की, एका रुग्णाला आतड्याला तिढा पडला आहे आणि त्याचे ताबडतोब पुन्हा एकदा ऑपरेशन करावेच लागेल. फोन दुपारी साधारण साडेचार वाजताचे दरम्यान आला. मी lunch करीत होतो. अजून एक emergency operation करणेचे होते. ते उरकले तातडीने विमान booking हवे होते. मी, माझा भाऊ डॉ विद्याधर आणि Dr सचिन अशी टीम तयार झाली. अम्मा (डॉक्टर राणी बंग) यांच्याशी बोलणे झाले. माझे गुरू डॉक्टर रवींद्र वोरा सर यांच्यशी चर्चा केली. त्यांचे आशिर्वाद घेतले.

लोणंदमधून निघायला जवळजवळ साडेसात वाजले. रात्रीची बाराची flight book केली. ती त्या दिवशीची सर्वात लवकरची flight होती. योग्य वेळेत विमानतळावर पोहोचलो. flight वेळेत निघाली.

पहाटे २ वाजता विमानतळावरून बाहेर आलो. आमच्यासाठी सर्च संस्थेने एक भाड्याची कार book केली होती. नागपूरहून गडचिरोली १८० किमी आणि पुढें १८ किमी सर्च या संस्थेत. असा प्रवास होता.

अगोदरच कारच्या ड्रायव्हरचे नाव, फोन नंबर पाठविला होता. बाहेर आलो, ड्रायव्हरला फोन केला. लगेचच तो आला. ड्रायव्हर शेजारी डॉक्टर सचिन, मी आणि विद्याधर मागे बसलो. नेहमीप्रमाणे ड्रायव्हरची चौकशी केली. झोप झाली आहे का, गडचिरोली रस्ता माहीत आहे का, वगैरे विचारले. सगळी अपेक्षित उत्तरे मिळाली. आम्ही खूष होतो.

१५ ते २० किलोमीटर झाल्यावर मुख्य रस्त्याला लागलो. रस्ता खूप छान होता. वीस वर्षात हा खूप मोठा फरक पडला आहे. हल्ली ट्रॅफिक पण थोडे फार होते. मधेच एका चहाच्या टपरीवर थांबलो. मस्तपैकी चहा घेतला. ड्रायव्हरने तोंड धुतले, फेस वॉश घेतला.

आम्ही गाणी लावली. ड्रायव्हर जागा रहावा यासाठीच्या अशा क्लृप्त्या लढवत होतो.रस्ता आता एकाकी पडला होता. ट्रॅफिक कमी होते. थोडे पुढे गेलो तर गाडी सरळ रस्त्यावर वळणे (sinuous ) घेऊ लागली. ड्रायव्हरला झोप येत होती. बिचार्‍याची आधी झोप झाली नसावी. किंवा दिवसभर ड्रायव्हिंग करून पुन्हा हा ‘कॉल’ घेतला असावा. शेवटी माणूस कशासाठी कशासाठी? पोटासाठी पोटासाठी? सारे करतो.

विद्याधर आणि सचिनने गाडी थांबविली. ड्रायव्हर यांना मागे बसायला सांगितले. तोपर्यंत आमचा रस्ता चुकला होता. आम्ही ताडोबा जंगलातून चाललो होतो. ड्रायव्हर गाडीतून खाली उतरायला घाबरला. कारण गेल्या आठवड्यात एका मुलीला पहाटे एका वाघाने मारले होते. वाघांना खायला कमी पडल्यामुळे आता ते man eaters झालेत. पटकन कसेतरी ड्रायव्हर उतरला आणि विद्याधर, सचिन यांनी गाडीचा ताबा घेतला आणि आम्ही सारेजण सकाळीं पावणेसात वाजता सर्चला पोहोचलो. अपेक्षेपेक्षा दोन तास उशिरा… ड्रायव्हर बिचारा ओशाळला होता. परत कधी जाणार असे विचारत होता, अगदी दुपारपर्यंत तिथेच थांबला होता.

आम्ही तिघेही फ्रेश होऊन सकाळीं न्याहारी केली, दांतेश्वरी देवीचे दर्शन घेतले. रुग्णासाठी आशिर्वाद मागितले आणि ऑपरेशनसाठी रवाना झालो. ऑपरेशन व्यवस्थित पार पडले. तिथले पेशंट अतिशय सोशिक, समंजस असतात. त्यांच्या डोळ्यात प्रेम आणि आदराची भावना दिसून येते. शब्दांपेक्षा डोळ्यांनी ते जास्त बोलतात. मला नेहमी हे जाणवतं, भावतं, आवडतं.

आम्हाला परत यावे लागले. सर आणि अम्मा यांना खूप वाईट वाटले. परत परत ते बोलून दाखवित होतें. आम्हाला खूप संकोचल्यासारखे वाटत होते. संध्याकाळी प्रार्थनेच्या वेळी सरांनी सर्वांसोबत बोलून दाखविले. खरं तर आमची नैतिक जबाबदारी होती, कुठल्याही रुग्णाला काहीही complications झाली की त्याची सर्व जबाबदारी आमचीच असते. ‘रुग्णसेवा’ हे व्रत असते, हे आम्ही सर आणि अम्मा यांच्याकडूनच तर शिकलो ना. प्रत्येक कॅम्पला आजारी असल्या तरी अम्मा दिवसरात्र डोळ्यात तेल घालून प्रत्येक रुग्णाची सेवा करतात.

रुग्ण stable करून आम्ही रात्री ११ वाजता ‘सर्च’ मधून निघालो. नागपूरला ‘सर्च’चीच गाडी आम्हाला होती. वाटेत जंगल सफारी जणू होती. दोन वेळा कोल्हे आणि एकदा वाघोबाचे दर्शन झाले. हा… हा… ट्रिप मस्त झाली.

पहाटेच्या फ्लाईटने पुण्यात आलो. मस्तपैकी गरम गरम चहा घेतला आणि डोक्याला तेल लावून एक सकाळची गाढ झोप मागून घेतली.

  • @sadasut. संजय सदाशिव शिवदे, लोणंद.
    १ नोव्हेंबर सकाळीं ७.००

Back to top button
Don`t copy text!