
थेट WhatsApp वर मिळवा
लायन्स क्लब ऑफ फलटणच्या पाचव्या सर्वसाधारण सभेत माळजाई मंदिर परिसरातील विकासकामे, ओपन जिम आणि अद्ययावत अभ्यासिकेच्या प्रस्तावाला एकमताने मंजुरी देण्यात आली.
स्थैर्य, फलटण, दि. १७ नोव्हेंबर : लायन्स क्लब ऑफ फलटणची पाचवी सर्वसाधारण सभा माळजाई मंदिर येथील लायन्स हॉलमध्ये उत्साहात संपन्न झाली. या सभेत आर्थिक आढावा, आगामी सामाजिक उपक्रम आणि माळजाई मंदिर व उद्यान समितीच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकासकामांबाबत सविस्तर चर्चा करून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
ओपन जिम आणि नाना-नानी पार्क
लायन्स क्लब संचलित माळजाई मंदिर व उद्यान समितीच्या वतीने ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी उभारण्यात येत असलेला ओपन जिम प्रकल्प १५ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. तसेच कमिन्स इंडिया कंपनीच्या सहकार्याने ‘नाना-नानी पार्क’ विकसित करण्याचा आणि माळजाई मंदिराला संरक्षित भिंत उभारण्याचा प्रस्ताव यावेळी मांडण्यात आला. या सर्व प्रस्तावांना सदस्यांनी एकमताने अनुमोदन दिले.
अद्ययावत अभ्यासिकेला मंजुरी
सभेमध्ये माळजाई मंदिर परिसरात अद्ययावत लायन्स अभ्यासिका उभारण्याच्या प्रस्तावावर महत्त्वपूर्ण चर्चा झाली. यासाठी रहिमतपूर येथील हिंद वाचनालयाची पाहणी करून पुढील नियोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, या प्रस्तावाला एकमताने मंजुरी देण्यात आली. याशिवाय आगामी काळात जागतिक एड्स प्रतिबंध दिन, ॲडव्होकेट डे यांसारखे आरोग्यविषयक आणि सेवाभावी उपक्रम राबवण्यावरही शिक्कामोर्तब झाले.
मान्यवरांचा सन्मान
सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल कॅबिनेट सदस्य लायन संजय दाते आणि माजी चेअरमन लायन महेश साळुंखे यांचा क्लबचे चेअरमन लायन रणजीत बर्गे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. तसेच माजी प्रांतपाल लायन भोजराज नाईक निंबाळकर यांनी सर्व PST पदाधिकाऱ्यांचे बुके देऊन अभिनंदन केले.
सभेच्या प्रारंभी सचिव लायन प्रमोद निंबाळकर यांनी इतिवृत्त वाचन केले, तर खजिनदार लायन दिलीप शिंदे यांनी आर्थिक ताळेबंद मांडून शेवटी उपस्थितांचे आभार मानले.





