उजळवूया मातीचे भाग्य, तपासूया जमिनीचे आरोग्य…


अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी देश आणि वैयक्तिक पातळीवर आपण जमिनीत मोठ्या प्रमाणावर रसायनं, औषधं आणि यांत्रिकीकरणाचा वापर केला. यामुळे जमिनीतून मिळणाऱ्या उत्पादनात वाढ तर झालीच, पण दुसरीकडे मातीचं आरोग्य ढासळत गेलं. जमिनीचा पोत बिघडत गेला आणि तिची सुपीकता कमी झाली. ज्या ज्या वेळेस आपण  शेतकऱ्यांशी त्यांच्या उत्पन्नाबद्दल चर्चा करतो, त्या त्या वेळी एक उत्तर हमखास ऐकायला मिळतं. ते म्हणजे, पूर्वी ज्या शेतात एका एकराला १० ते १२ क्विंटल कापूस व्हायचा, तिथं आता ७ ते ८क्विंटलच कापूस होतो. पण, हे असं का झालं, तर यामागे एक प्रमुख कारण सांगितलं जातं ते म्हणजे जमिनीची उत्पादकता कमी होणे.  त्यामुळे मग आता गरज निर्माण झालीय, ती जमिनीचं आरोग्य तपासायची. म्हणजे आपण ज्या जमिनीत पीक पिकवतो, तिथल्या मातीत कोणती मूलद्रव्ये किती प्रमाणात आहे, ते जाणून घेण्याची आणि त्यानुसार जमिनीतील मूलद्रव्यांचं प्रमाण संतुलित ठेवण्याची. सध्या खरीपाच्या कामांची सुरूवात शेत-शिवारांमध्ये झाली आहे, सध्या ‘शासन आपल्या दारी’ या मोहिमेच्या निमित्तानं आपण जमिनीचे आरोग्य म्हणजे काय? माती परीक्षणाद्वारे जमिनीची आरोग्य पत्रिका कशी काढायची? ती काढण्यासाठी मातीचे नमुने कसे घ्यायचे? या पत्रिकेचे फायदे काय आहेत? याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

जमिनीचं आरोग्य

जमिनीचं आरोग्य हे जमिनीत असणारे घटक आणि जमिनीचे गुणधर्म यावर अवलंबून असतं. जमिनीमध्ये असणारी खनिजद्रव्ये, सेंद्रिय पदार्थ, जल आणि वायू हे चारही घटक पिकांच्या वाढीसाठी योग्य प्रमाणात असणं गरजेचं असतं.जमिनीचं आरोग्य चांगलं असेल तरच ती चांगल्या प्रमाणात उत्पादन देते. नत्र, स्फुरद, पालाश की जमिनीतील मुख्य अन्नद्रव्ये आहेत. तर कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि गंधक ही दुय्यम अन्नद्रव्ये आहेत. याशिवाय जस्त, लोह, तांबे, मंगल, बोरॉन आणि मॉलेब्डेनम ही सूक्ष्म अन्नद्रव्येही जमिनीत असतात. या सगळ्या अन्नद्रव्यांचं जमिनीतील प्रमाण तपासणं यालाच माती परीक्षण असं म्हणतात. माती परीक्षण करण्यासाठी सगळ्यात पहिला टप्पा येतो तो मातीचा नमुना योग्य पद्धतीनं घेण्याचा.

मातीचा नमुना पद्धत

मातीचा नमुना वर्षभरात केव्हाही घेता येतो. पण, बहुतेकदा रब्बी पिकांच्या काढणीनंतर किंवा उन्हाळ्यात नमुना घेतल्यास परीक्षणाचा अहवाल पेरणीपर्यंत उपलब्ध होतो. पिकांच्या काढणीनंतर जमीन कोरडी असताना मातीचा नमुना घ्यावा. पिकांना खत टाकले असेल तर त्यानंतर लगेच मातीचा नमुना घेऊ नये. मातीचा नमुना घेताना शेताचं उतार, रंग, पोत, खोली यानुसार वर्गीकरण करावं. प्रत्येक भागातून एक स्वतंत्र नमुना घ्यावा. पाणथळ जागा, झाडाखालील जमीन, बांधाजवळील जागा, शेतातील गुरे बांधण्याची जागा, शेतातील बांधकामाजवळचा परिसर, अशा ठिकाणाहून मातीचा नमुना घेऊ नये.  सपाट पृष्ठभागावर ३०X३०X३० सें.मी. लांबी, रुंदी व खोलीचा खड्डा तयार करावा. त्यात २ सें.मी. जाडीची माती खुरप्याच्या सहाय्यानं खरडून हातावर काढायची आणि प्लास्टिकच्या बादलीत घ्यावी. अशाप्रकारे प्रत्येक भागातून ५ ते १० नमुने प्रत्येक भागातून घ्यावे. नमुने घेतलेली माती एका कागदावर पसरावी. ती मिसळून घ्यावी. ढिगाचे चार भाग करून समोरासमोरील दोन भाग काढून टाका. उरलेले दोन भाग पुन्हा मिसळावे व पुन्हा चार भाग करावे. ही प्रक्रिया अर्धा किलोग्राम माती शिल्लक राहीपर्यंत करावी.

ही माती स्वच्छ कापडी पिशवीत भरावी. यासोबत एका कागदावर शेतकऱ्याचं नाव, पत्ता, गट किंवा सर्व्हे नंबर, जमिनीचा प्रकार, नमुना घेतल्याची तारीख, मागील हंगामात घेतलेले पीक व त्याचं उत्पादन, पुढील हंगामात घ्यावयाचे पीक याची माहिती लिहावी आणि हा नमुना स्थानिक कृषी विभागाच्या माती परीक्षण प्रयोगशाळेत घेऊन जावा.

प्रयोगशाळेत गेल्यानंतर…

मातीचा नमुना प्रयोगशाळेत नेल्यानंतर तिथं त्याची नोंदणी केली जाते. शेतकऱ्यानं नेमकं हा नमुना कोणत्या घटकांच्या तपासणीसाठी आणला आहे, ते सांगणं आवश्यक असतं. त्यानुसार यासाठीचं शुल्क आकारलं जातं. सर्वसाधारण मातीचा नमुना ज्यात सामू, क्षारता, सेंद्रीय कर्ब, स्फुरद आणि पालाश यांची तपासणी करायची असेल तर ३५ रुपये शुल्क आकारले जाते. आणि ३० दिवसांत मातीची आरोग्य पत्रिका अर्थात अहवाल दिला जातो. विशेष मातीचा नमुना ज्यात सामू, क्षारता, सेंद्रीय कर्ब, स्फुरद, पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम, मुक्त चुना आणि भौतिक गुणधर्माची तपासणी करायची असेल तर २७५ रुपये शुल्क आकारले जाते व ४५ आरोग्य पत्रिका दिली जाते. जमिनीतील सूक्ष्म मूलद्रव्ये जसं की लोह, जस्त, मंगल, तांबे यांची तपासणी करायची असेल तर २०० रुपये शुल्क आकारुन ३० दिवसांत आरोग्य पत्रिका दिली जाते. एकदा का कागदपत्रांची पूर्तता झाली की, मातीच्या नमुन्याला चाळणीद्वारे स्वच्छ केलं जातं आणि मग ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवलं जातं. इथं या नमुन्यातील वेगवेगळ्या घटकांची तपासणी केली जाते. त्यानुसार त्या घटकांचं मातीतील प्रमाण कमी आहे, जास्त आहे की पुरेसं आहे, हे संगणकावर नोंदवलं जातं. पुढे ही माहिती आरोग्य पत्रिकेवर नमूद केली जाते आणि ती पत्रिका शेतकऱ्याला सोपवली जाते.

जमिन आरोग्य पत्रिकेचे फायदे 

नंदुरबारचे जिल्हा अधिक्षक कषी अधिकारी राकेश वाणी सांगतात, माती परीक्षण केल्यामुळे शेतकऱ्याला आपल्या जमिनीत कोणत्या अन्नद्रव्यांची कमतरता आहे किंवा कोणते घटक जास्त प्रमाणात आहे याची माहिती मिळते. यामुळे खतांचं आणि सूक्ष्म मूलद्रव्यांचं नियोजनं करणं सोयीचं होतं. माती परीक्षण अहवालानुसार खते दिल्यास रासायनिक खतांवरील अवाजवी खर्च टाळता येतो आणि त्याचे दुष्परिणामही टाळता येतात. माती परीक्षण अहवालानुसार खते दिल्यास ती योग्य, संतुलित आणि शिफारशित प्रमाणात दिली जातात. यामुळे जमिनीचे आरोग्य सुधारतं आणि तिची उत्पादकता वाढीस लागते. परिणामी, पिकांचं उत्पन्न वाढण्यास मदत होते. माती परीक्षण केल्यामुळे जमिनीचे भौतिक, रासायनिक, जैविक गुणधर्म टिकवून ठेवता येतात. क्षारपड, चोपण, आम्लयुक्त जमिनीवर माती परीक्षण अहवालानुसार उपाययोजना करता येतात.

जमीन आरोग्य पत्रिकेचं वाचन

जमिनीची आरोग्य पत्रिका तर मिळाली, पण ती वाचायची कशी, त्यानुसार जमिनीला खतं द्यायची कशी, हे शेतकऱ्यांना अनेकदा लक्षात येत नाही. तुम्हाला जी आरोग्य पत्रिका दिली जाते तिचे साधारत: दोन भाग पडतात. पहिल्या भागात शेतकऱ्याविषयीची माहिती जसं की नाव, गाव, मोबाईल क्रमांक दिलेला असतो. त्यानंतर नमुन्याचा तपशील यात नमुना घेतल्याची तारीख, शेताचं क्षेत्र इ. बाबी नमूद केलेल्या असतात. दुसऱ्या भागात मातीच्या परीक्षणातून समोर आलेले परिणाम नोंदवलेले असतात. यात जमिनीतील १२ अन्नद्रव्यांची नावे आणि त्यासमोर जमिनीतील त्यांचं प्रमाण नमूद केलेलं असतं. तुमच्या जमिनीच्या गट क्रमांकात ही अन्नद्रव्ये किती प्रमाणात आहेत, याची वर्गवारी त्या त्या अन्नद्रव्यासमोर केलेली असते. खूप कमी, कमी, मध्यम, पुरेसं, उच्च, कमतरता अशा प्रकारे अन्नद्रव्यांची वर्गवारी केलेली असते. यानुसार मग आपल्या जमिनीतील मूलद्रव्याचं प्रमाण पाहून खताचा डोस किती वापरायचा, याची माहिती शेतकरी गावातील कृषी सहाय्यक किंवा कृषी विभागातील अधिकाऱ्यांकडून घेऊ शकतात.

०००

  • रणजितसिंह राजपूत , जिल्हा माहिती अधिकारी, नंदुरबार

Back to top button
Don`t copy text!