
थेट WhatsApp वर मिळवा
दिवाळीच्या सणानंतर घरोघरी मिठाई शिल्लक राहते. ही मिठाई फेकून न देता किंवा तशीच खाण्याचा कंटाळा आल्यास तिचा वापर करून चविष्ट पदार्थ तयार करता येतात.
स्थैर्य, सातारा, दि. १० नोव्हेंबर : दिवाळीचा सण संपल्यानंतर अनेक घरांमध्ये मिठाई आणि गोडधोड पदार्थांची मोठी रेलचेल पाहायला मिळते. नातेवाईक आणि मित्रमंडळींकडून मिळालेली मिठाई अनेकदा तशीच पडून राहते. अशा वेळी ही मिठाई फेकून न देता किंवा वारंवार खाण्याचा कंटाळा आल्यास तिचा चवदार पदार्थांसाठी पुनर्वापर करणे सोपे ठरते.
सोनपापडी आणि लाडूपासून नवे पदार्थ
अनेकांच्या घरी दिवाळीत मिळालेली सोनपापडी तशीच शिल्लक राहते. अशा वेळी सोनपापडीमध्ये थोडे दूध मिसळून मऊ पेस्ट तयार करून त्यापासून चवदार पुरणपोळी बनवता येते. तसेच बुंदीचे लाडू जास्त प्रमाणात उरल्यास दूध आटवून त्यात लाडू कुस्करून उत्कृष्ट बुंदीची खीर तयार करता येते.
शेक आणि गोड पराठे बनवण्याची सोपी पद्धत
फ्रिजमध्ये खव्याची मिठाई शिल्लक असेल तर ती थंड दुधात घालून मिक्सरमध्ये फिरवल्यास उत्तम शेक तयार होतो. याशिवाय, कोणत्याही प्रकारच्या उरलेल्या मिठाईचा चुरा करून गोड पराठ्यांचे सारण म्हणून वापर केल्यास लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आवडीने खातात.





