स्थैर्य, नवी दिल्ली, दि.११: अत्यंत अटीतटीच्या झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीएने काठावरचे बहुमत मिळवत सत्ता कायम राखली आहे. मात्र या निवडणुकीत नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड पक्षाच्या जागांमध्ये लक्षणीय प्रमाणात घट झाली आहे. तर भाजपा एनडीएमधील मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे नितीश कुमार यांना मुख्यमंत्रिपद मिळण्याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी नितीश कुमार यांना संघ आणि भाजपाची साथ सोडण्याचे आवाहन केले आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाल्यानंतर सकाळी एकापाठोपाठ एक ट्विट करत दिग्विजय सिंह यांनी नितीश कुमार यांना भाजपाचा साथ सोडण्याचे आवाहान केले आहे. दिग्विजय सिंह म्हणाले की, भाजपा आणि संघ हे अमरवेलीप्रमाणे आहे. ते ज्या झाडाला विळखा घालतात. ते झाड वाळून जाते. त्यानंतर या वेलीचा त्यावर कब्जा होतो. नितीशजी लालू प्रसाद यादव यांनी तुमच्यासोबत संघर्ष केला आहे. आंदोलनांमध्ये सोबत तुरुंगवास भोगला आहे. त्यामुळे संघ आणि भाजपाच्या विचारधारेला सोडचिठ्ठी देऊन तेजस्वी यांना आशीर्वाद द्या आणि अमरवेलीसारख्या असलेल्या भाजपा आणि संघाला बिहारमध्ये वाढण्यापासून रोखा.
नितीशजी आता तुमच्यासाठी बिहार हे खूप छोटे झाले आहे. आता तुम्ही भारताच्या राष्ट्रीय राजकारणात या. सर्व समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष विचारसरणींवर विश्वास ठेवणा-या लोकांमध्ये ऐक्य घडवून आणण्यास मदत करा. इंग्रजांनी वाढवलेली फूट पाडा आणि राज्य करा ही संघाने जोपासलेली नीती हाणून पाढण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन दिग्विजय सिंह यांनी केले.