काँग्रेसमध्ये प्रवेशासाठी मोठा ओघ; अनेक नेते संपर्कात- बाळासाहेब थोरात


 

स्थैर्य,मुंबई, दि ११: काँग्रेस विचारांवर श्रद्धा असलेला, काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग राज्यात असून हा विचार बळकट करण्यासाठी अनेकजण काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक आहेत. आज सातारा व ठाणे जिल्ह्यातील भाजपा नेत्यांनी कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राज्यभरातून अनेक नेते कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये येण्याचा ओघ वाढला असून अनेकजण संपर्कात आहेत. लवकरच ते ही काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. काँग्रेसची ताकद राज्यात आणखी वाढण्यास यामुळे मदतच होईल, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे.

आज गांधी भवन येथे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत सातारा जिल्ह्यात सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे तरूण नेते रणजित देशमुख व ठाणे जिल्हा भाजपाचे माजी अध्यक्ष दयानंद चोरगे यांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्षा व महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, गृहराज्यमंत्री सतेज बंटी पाटील, आ. भाई जगताप, सरचिटणीस माजी आ. मोहन जोशी, सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत, यशवंत हाप्पे, गजानन देसाई, सचिव जोजो थॉमस आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना थोरात म्हणाले की, काँग्रेस पक्ष हा गरिब, सामान्य, तळागाळातील कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. कार्यकर्त्यांना ताकद देणारा पक्ष आहे. मध्यंतरी थोडा कठीण काळ आला होता त्यावेळी काही जण पक्ष सोडून गेले. ‘सुबह का भुला शाम घर वापस आये तो उसे भुला नही कहते’. काँग्रेस सोडून गेलेले काँग्रेसमध्ये पुन्हा येत आहेतच पण इतर पक्षातीलही अनेकजण काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक आहेत. तुम्ही पक्षासाठी कार्य करा, तुम्ही मोठे झालात तर पक्षही मोठा होईल. आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. काँग्रेसचा विचार तळागाळापर्यंत पोहचवून पक्ष बळकट करा आणि काँग्रेसला गतवैभव प्राप्त करुन द्या, असे आवाहन थोरात यांनी केले.

यावेळी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, रणजित देशमुख यांनी सातारा जिल्ह्यातील खटाव माण या दुष्काळी भागात सहकाराच्या माध्यमातून या भागाचे चित्र बदलण्याचे काम केले आहे. परवाच विलासकाका पाटील उंडाळकर, उदयसिंह उंडाळकर हे स्वगृही परतले आणि आज रणजित देशमुख यांच्या रुपाने पक्षाला आणखी ताकद मिळाली आहे. काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी काम करा आणि जिल्हा काँग्रेसमय करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. बाळासाहेब थोरात यांचा पायगुण चांगला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यात काँग्रेस पक्ष विस्तारत असून ते प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर दोन महिन्याच काँग्रेस महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्यातील सत्तेत सहभागी होऊ शकली. त्यांच्या नेतृत्वाखाली तरुणांना पक्षात काम करण्यास मोठा वाव आहे, असे राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम म्हणाले.

रणजित देशमुख यांच्यासह माजी पंचायत समिती सदस्य भारतराव शंकरराव जाधव, हनुमान शिक्षण प्रसारक मंडाळाचे अध्यक्ष संजीव साळुंके, बाळासाहेब झेंडे, संतोषराव पवार, निलेश जाधव, विजय शिंदे यांनी तर दयानंद चोरगे यांच्यासह भिवंडी पंचायत समितीचे माजी सभापती मोतीराम चोरघे, भिवंडी महानगरपालिका बांधकाम समितीचे माजी सभापती , माजी शिवसेना महानगर प्रमुख, भाजपाचे ठाणे पालघरचे माजी विभागीय संघटक तुकाराम चौधरी, शिवसेना माजी विभाग प्रमुख गणेश चौधरी, प्रभाकर पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती भिवंडीचे सदस्य सुरेश जोशी, भाजपा ठाणे ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष संजय बापू पाटील, भाजपा ठाणे जिल्हा ग्रामीण शिक्षक आघाडीचे अध्यक्ष देवेंद्र भेरे,नवनाथ सुतार, देविदास केणे यांच्यासह भिवंडी, कल्याण मधील असंख्य कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

मा. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी प्रयत्न करु असे रणजित देशमुख व दयानंद चोरगे यावेळी म्हणाले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!