स्थैर्य, सातारा, दि.८ : गेल्या महिन्यापासून रिक्त असलेले स्थानिक गुन्हे शाखेच्या निरीक्षकपदी कर्हाड तालुका पोलीस ठाण्याचे किशोर धुमाळ यांची नियुक्ती झाली आहे. एलसीबीच्या खुर्चीसाठी सुरू असलेल्या चढाओढीला आता पूर्णविराम मिळाला आहे. नियुक्ती होताच सोमवारी सायंकाळी धुमाळ यांनी पदभार स्विकारला. तत्कालीन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची सोलापूर ग्रामीणला बदली झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनीही सोलापूरला बदली करून घेतली. त्यानंतर गेल्या तीन महिन्यापासून एलसीबीचे पद रिक्त होते. या पदावर येण्यासाठी बरेच पोलीस अधिकारी इच्छुक होते. विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे एलसीबीच्या नव्या कारभाराची नियुक्ती लांबणीवर पडली होती. सर्जेराव पाटील यांची बदली झाल्यानंतर या पदासाठी पोलीस निरीक्षक विजय कुंभार हे मुख्य दावेदार समजले जात होते त्यांनी यापूर्वी स्थानिक गुन्हे शाखेला काम केले असल्यामुळे त्यांची वर्णी लागेल असे बोलले जात होते. मात्र सोमवारी अचानकपणे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांचे नाव निश्चित झाले. त्यांनी ही तात्काळ एलसीबीचा पदभार स्वीकारला. पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी यापूर्वी शाहूपुरी पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला होता. यादरम्यान त्यांनी सुरुची प्रकरणांमध्ये त्यात चांगली कामगिरी केली होती दोन्ही जमाव एकत्र येऊ नये यासाठी त्यांनी स्वतः छातीची ढाल करून जमावाला पांगवले होते. त्यामुळे मोठा अनर्थ टळला होता. या अनुभवा बरोबरच त्यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात असताना खून दरोडे मारामारी अशाप्रकारचे ही गुन्हे उघडकीस आणले. याच कामाची दखल घेऊन त्यांची ‘एलसीबी’च्या कारभारी पदी नियुक्ती झाली असल्याचे बोलले जात आहे.