नरभक्षक बिबट्याला शाेधण्यासाठी करमाळ्यात अखेर उसाचा फडच पेटवण्यात आला तरीही बिबट्या निसटला.
स्थैर्य, करमाळा, दि.८: तालुक्यातील चिखलठाण-केडगाव
हद्दीवर बिबट्याने एका ऊसतोड कामगाराच्या मुुलीवर हल्ला करीत तिला ठार
मारले. शनिवारी केडगाव येथे हल्ला झाला होता. 48 तास उलटत नाही तोच हा
दुसरा हल्ला झाला असून यापूर्वीच्या हल्ल्यांमध्ये बिबट्याने दोन बळी घेतले
आहेत. त्यामुळे बिबट्याने घेतलेल्या बळींची संख्या ३ झाली आहे.
फुलाबाई
आरचंद कोटले ( ९, रा. दुसाणे, ता. साक्री, जि. धुळे) असे मृत मुलीचे नाव
आहे. सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास फुलाबाई आपल्या भावंडासह खेळत असताना
अचानक बिबट्याने हल्ला केला. या वेळी आरडाओरडा झाल्यानंतर हातातील कोयते
घेऊन इतर ऊसतोड कामगार आवाजाच्या दिशेने धावले. तोपर्यंत बिबट्याने
फुलाबाईला उसाच्या शेतात नेले. तिथे तिच्यावर दुसरा हल्ला करण्यापूर्वीच
कुटुंबीय आणि इतर मजूर पोहोचले व त्याला पळवून लावले. त्याला पकडण्यासाठी
उसाच्या फडात आग लावण्यात आली, पण बिबट्या निसटला.
दिवसाआड बिबट्याचा हल्ला
आष्टी,
बीड भागातून आलेला हा बिबट्या दर दुसऱ्या दिवशी हल्ला करतो हे त्याचे
वैशिष्ट्य आहे. सुरुवातीला त्याने करमाळा तालुक्यात लिंबेवाडी येथे ३
डिसेंबर, अंजनडोह येथे ५ डिसेंबर आणि चिखलठाण येथे ७ डिसेंबरला हल्ला केला
आहे. सर्व हल्ले झाल्यानंतर हा बिबट्या पुन्हा त्या भागात न जाता दर वेळी
सुमारे सोळा ते सतरा किलोमीटरच्या अंतरावर दुसरा हल्ला करीत आहे.