फलटण: शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा – लक्ष्मण हाकेंचा इशारा

राज्यातील सरकारी शाळा बंद पडत असल्याच्या निषेधार्थ शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, असा थेट इशारा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी फलटण येथे दिला आहे.

स्थैर्य, फलटण, दि. 4 ऑगस्ट : राज्यातील सरकारी शाळा मोठ्या प्रमाणावर बंद पडत असून शिक्षक भरती प्रक्रियेतही घोटाळ्यांचे आरोप होत आहेत. या परिस्थितीची नैतिक जबाबदारी स्वीकारून राज्याच्या शिक्षणमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा ओबीसी चळवळीचे नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी फलटण येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला.

आरक्षणाची गरज कायम

संविधानाने सामाजिक न्यायाची संकल्पना स्वीकारून वंचित, दलित, आदिवासी, भटके-विमुक्त आणि ओबीसी समाजाला समान संधी मिळण्यासाठी आरक्षणाचे धोरण लागू केले आहे. जोपर्यंत सर्वांना समान शिक्षण, संधी आणि वागणूक मिळत नाही, तोपर्यंत आरक्षणाची गरज कायम राहणार आहे. सोशल मीडियावर आरक्षणविरोधी वातावरण निर्माण करून समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न होत असून तरुणांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रा. हाके यांनी केले.

शैक्षणिक विषमतेवर टीका

शहरातील कॉन्व्हेंट शाळेत शिकणारा विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील एकशिक्षकी शाळेत शिक्षण घेणारा शेतकऱ्याचा मुलगा यांच्यात समान स्पर्धा होऊ शकत नाही. त्यामुळे सामाजिक आणि शैक्षणिक विषमता दूर होईपर्यंत आरक्षण कायम राहिले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. सरकारी शिक्षण व्यवस्था सक्षम करण्याऐवजी खासगी शिक्षण संस्थांना चालना मिळत असून सर्वसामान्य आणि शेतकरी कुटुंबांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचा आरोपही प्रा. हाके यांनी केला.

विधिमंडळ अधिवेशनावर नाराजी

पावसाळी अधिवेशनात ओबीसी, भटके-विमुक्त आणि वंचित समाजाच्या प्रश्नांवर पुरेशी चर्चा झाली नसल्याची खंत व्यक्त करत त्यांनी लोकप्रतिनिधींवर टीका केली. ओबीसी समाजाने आपल्या हक्कांसाठी संघटित होऊन संघर्ष उभारण्याची गरज असून राज्यभर जनजागृती अभियान सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

Back to top button
Don`t copy text!