पालखी काळात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही : प्रांताधिकारी सचिन ढोले


दैनिक स्थैर्य | दि. 10 जुन 2024 | फलटण | श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळ्याचे तीन मुक्काम हे फलटण तालुक्यात आहेत. पालखी सोहळा तालुक्यातून मार्गस्थ होत असताना सर्व प्रशासनाने समन्वय राखत काम करणे आवश्यक आहे. वारकऱ्यांना आवश्यक असणाऱ्या सेवा सुविधा देण्यासाठी प्रशासनाने सतर्क राहून कामकाज करावे. या काळामध्ये कोणत्याही विभागाचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही; असे स्पष्ट निर्देश फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी यावेळी दिले.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने आढावा बैठक फलटण तहसील कार्यालयामध्ये प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या अध्यक्षतेखाली बोलवण्यात आलेली होती. यावेळी फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले, तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव, नगर परिषदेचे मुख्याधिकारी निखिल मोरे यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद बांधकाम, महावितरण, पंचायत समिती, परिवहन महामंडळ, अन्न व औषध प्रशासन, आरोग्य व जलसंपदा विभागाचे विविध अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पालखी सोहळ्याच्या कालावधीमध्ये फलटण तालुक्यासाठी सर्व सरकारी व खाजगी रुग्णालयांमध्ये पुरेसा औषध साठा उपलब्ध असणे गरजेचे आहे. यासोबतच फलटण शहरासह तालुक्यांमध्ये विविध ॲम्बुलन्सच्या कार्यरत आहेत त्यांना सतर्क राहण्याबाबतच्या सूचना देण्यात याव्यात. खाजगी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असणाऱ्या बेड पैकी काही बेड हे आरक्षित करून ठेवणे गरजेचे आहे. फलटण मध्ये पुरेसा रक्त साठा तयार करण्यात यावा; अशा सूचना यावेळी प्रांताधिकारी ढोले यांनी दिल्या.

यावेळी बोलताना प्रांताधिकारी ढोले म्हणाले की; राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अंतर्गत जे रस्ते आहेत. त्या रस्त्यांवरील रस्त्याची कामे व पुलंची कामे करणे गरजेचे आहे. यासोबतच सर्व रस्त्यांवर सर्विस रोड तयार करणे गरजेचे आहे.

फलटण तालुक्यामध्ये महावितरणचे असणारे ट्रान्सफॉर्मर याची तपासणी करून आवश्यक असणारे बदल तातडीने करावेत. विद्युत तारा व पोल यांची व्यवस्था योग्य आहे का ? ते तपासून पालखीच्या अनुषंगाने आवश्यक ती व्यवस्था करण्यात यावी. पालखीतळावर महावितरणचे विशेष कर्मचारी नियुक्त करावेत. पालखी काळामध्ये भारनियमन टाळणे गरजेचे आहे; अशा सूचना यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांना प्रांताधिकारी ढोले यांनी दिल्या.

यासोबतच पालखी कालावधीमध्ये उभारण्यात येणारे टॉयलेट्स व तळावर लागणाऱ्या इतर बाबींचा आढावा प्रांताधिकारी ढोले यांनी घेतला.


Back to top button
Don`t copy text!