दैनिक स्थैर्य । दि.३१ मार्च २०२२ । नागठाणे । नागठाणे तीन गूंठे जमिनीच्या वादातून दोन गटात बाचाबाची होऊन त्याचे पर्यावसन भांडणात झाले. खोडद (ता.सातारा) येथे मंगळवारी ही घटना घडली. याप्रकरणी दोन्ही गटाकडून हाफ मर्डर, रायटिंग सह दरोड्याचा परस्परविरोधी गुन्हे बोरगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत जितेंद्र भगवान पवार यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, खोडद येथील गट नं.२१८ मधील जमिनीवरून पूर्वीच्या झालेल्या वादातून मंगळवारी सकाळी राहुल गायकवाड यांच्यासह २० ते २५ लोकांनी काठ्या, फावडे व टिकाव घेऊन माझ्यासह कुटुंबियांवर हल्ला केला. यावेळी त्यांनी ठार मारण्याचा उद्देशाने अंगावर जेसीबी मशीन घातली. यामध्ये मला वाचण्यासाठी आलेला हॉटेल कामगार जखमी झाला असे म्हटले आहे.
तर राहुल विठ्ठल गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांनी खोडद येथील गट नं .२१८ मधील वैशाली संजय पवार यांची ३ गुंठे जमीन खरेदी केली आहे. या जमिनीसाठी कंपाउंड करण्यासाठी मंगळवारी ते जेसीबी घेऊन खड्डे खोदण्यासाठी गेले असता जितेंद्र पवार यांच्यासह हॉटेलमधील पुरुष व महिला कर्मचारी अशा सुमारे १० ते १५ जणांनी लाकडी दांडके, लोखंडी पाईप, दगड यांच्या साहाय्याने हल्ला करून जितेंद्र पवार यांनी त्यांच्या गळ्यातील सुमारे ५५ हजार रुपये किमतीची सोन्याची चेन हिसकावली व जेसीबीच्या काचा फोडून तिचे २० हजार रुपयांचे नुकसान केल्याचे म्हटले आहे.
मंगळवारी रात्री उशिरा दोन्ही गटाकडून परस्परविरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या.या दोन्ही घटनांचा पुढील तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. सागर वाघ करत आहेत.