
थेट WhatsApp वर मिळवा
देशातील छोट्या व्यापाऱ्यांना आणि दुकानदारांना डिजिटल पेमेंट व्यवहारांशी जोडण्यासाठी व प्रोत्साहन देण्यासाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) ‘यूपीआय व्यापार सक्षम योजना’ सुरू केली आहे. या योजनेमुळे आता किरकोळ दुकानदारांना डिजिटल व्यवहारांवर आकर्षक प्रोत्साहन मिळणार आहे.
स्थैर्य, सातारा, दि. १३ नोव्हेंबर : छोट्या दुकानदारांच्या दुकानात नवीन भौतिक यूपीआय क्यूआर कोड लावल्यास तीनशे रुपये आणि साउंडबॉक्स बसवल्यास सातशे पन्नास रुपयांचे इन्सेंटिव्ह संबंधित बँकांना व पेमेंट कंपन्यांना दिले जाणार आहे. वार्षिक चाळीस लाख रुपयांपर्यंत उलाढाल असणारे छोटे व्यापारी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरतील. यामध्ये प्रामुख्याने टियर-३ ते टियर-६ मधील शहरांवर, ग्रामीण भागांवर तसेच उत्तर पूर्व राज्ये, जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील व्यापारांवर विशेष भर देण्यात आला आहे.
व्यवहारांसाठी नियमांची अट
केवळ क्यूआर कोड किंवा साउंडबॉक्स बसवून चालणार नाही, तर त्याचा प्रत्यक्ष वापर होणे अनिवार्य आहे. यासाठी त्रैमासिकातील तीन महिन्यांपैकी किमान दोन महिन्यांत पस्तीस पात्र व्यवहार आणि प्रत्येक महिन्यात किमान पाच हजार रुपयांचे व्यवहार होणे आवश्यक आहे. या योजनेमुळे देशातील छोट्या व मध्यम दुकानदारांपर्यंत यूपीआय व्यवहारांचा विस्तार होणार असून ग्राहकांना डिजिटल पेमेंट करण्यास अधिक प्रोत्साहन मिळणार आहे.





