स्थैर्य, कराड, दि.१४: येथील ज्येष्ठ अभिनेत्री, माजी मुख्याध्यापिका श्रीमती कमल ठोके (वय 74) यांचे काल (ता. १४) सायंकाळी बंगळुरू येथे निधन झाले. मराठी चित्रटसृष्टीत त्या जिजी म्हणून ओळखल्या जात होत्या. झी मराठी वाहिनीवरील लागिरं झालं जी या धारावाहिकेतून त्या जिजी म्हणून घराघरांत पोचल्या. काही दिवसांपासून त्या कर्करोगाने आजारी होत्या. त्यांच्यावर बंगळुरू येथे उपचार सुरू होते. आज 14 नोव्हेंबरला सायंकाळी त्यांचे निधन झाले.
श्रीमती कमल ठोके यांनी शिक्षकी पेशा सांभाळत आपला अभिनय जागृत ठेऊन नाटक, राज्य नाट्य स्पर्धांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीतही काम केले. सासर माहेर, सखा भाऊ पक्का वैरी, कुंकू झालं वैरी, भरला मळवट, बरड अशा अनेक चित्रपटात त्यांनी महत्वाच्या भूमिका केल्या. शिक्षिकी पेशातील निवृत्तीनंतरही त्यांनी अभिनयाची सेवा केली. अल्पावधीत प्रसिद्धीचे शिखर पार करणारी झी मराठीची लागिरं झालं जी या सिरीयलमधून त्या घराघरात जिजी या नावाने परिचित झाल्या आणि नावलौकिक मिळवला, तसेच सध्या त्या देवमाणूस या मालिकेत कार्यरत होत्या.
श्रीमती ठोके यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे, मुलगी असा परिवार आहे. श्रीमती ठोके यांचे पार्थिव दि. 15 नोव्हेंबर 2020 रोजी कऱ्हाडला सकाळी 6 वाजता मंगळवार पेठ कमळेश्वर मंदिर येथील निवासस्थानी आणणात येणार आहे. अंत्यदर्शनानंतर अंत्यविधी कमळेश्वर मंदिर शेजारील स्मशानभूमीत सकाळी 10 वाजता होणार आहे.