
थेट WhatsApp वर मिळवा
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली असून सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता आहे.
स्थैर्य, सातारा, दि. ०८ ऑक्टोबर : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर येत आहे. तांत्रिक कारणांमुळे किंवा वेळेवर प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे ज्या पात्र महिलांना सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला नाही, त्यांना सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही महिन्यांचे मिळून एकूण ३ हजार रुपये एकत्र मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. प्रशासनाकडून यासंबंधीची आवश्यक ती तयारी अंतिम टप्प्यात असल्याची माहिती समजते.
अपात्र अर्जांची पुनर्रचना आणि बँक डीबीटी प्रक्रिया
योजनेचा निधी थेट लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी बँक खात्यांशी आधार लिंक असणे अनिवार्य करण्यात आले आहे. अनेक महिलांच्या अर्जात त्रुटी आढळल्याने तसेच डीबीटी (DBT) सक्रिय नसल्याने काही हप्ते रखडले होते. प्रशासनाने या त्रुटी दूर करून तांत्रिक अडचणी सोडवण्यावर भर दिला आहे, जेणेकरून पात्र महिलांपैकी एकही लाभार्थी या आर्थिक लाभापासून वंचित राहणार नाही.
सणासुदीच्या काळात महिलांना मोठा दिलासा
आगामी सणासुदीचे दिवस लक्षात घेता राज्य सरकारकडून थकबाकीसह दोन्ही महिन्यांचे हफ्ते एकत्र देण्याचे नियोजन केले जात आहे. ज्या महिलांना ऑगस्टचा हप्ता मिळाला होता पण सप्टेंबरचा हप्ता खात्यात जमा झाला नाही, त्यांच्या बँक खात्याची पडताळणी पूर्ण करून दोन्ही महिन्यांची संयुक्त रक्कम लवकरच जमा केली जाईल. या निर्णयामुळे राज्यातील लाखो महिलांना आर्थिक मदत मिळून मोठा दिलासा मिळणार आहे.



