फलटण: क्रांतीबा ज्योतिबा फुले हे भारतीय समाज सुधारण्याचे अग्रदूत – प्रा. डॉ. प्रभाकर पवार


मुधोजी महाविद्यालयात आयोजित प्रबोधन कार्यक्रमात ‘भारतीय समाज क्रांतीचे अग्रदूत: क्रांतिबा फुले’ या विषयावर प्रा. डॉ. प्रभाकर पवार यांनी मार्गदर्शन करत त्यांच्या कार्याला उजाळा दिला.

स्थैर्य, फलटण, दि. 11 मे : पेशवाईच्या अस्तांनंतर १९ व्या शतकात भारतात आधुनिक विचार व समाज सुधारण्याचे वारे वाहू लागले. या काळात सर्वप्रथम शिक्षण, ज्ञान आणि स्त्री-पुरुष समानतेचा नारा देऊन क्रांतीबा ज्योतिबा फुले यांनी अंधश्रद्धा व दांभिक वृत्तीला कडवे आव्हान दिले. मुलींची शाळा काढून शूद्रातिशूद्र बहुजन समाजाला गुलामगिरीतून बाहेर काढण्याचा कृतीकार्यक्रम त्यांनी आखला. त्यामुळे क्रांतीबा फुले हेच भारतीय समाज सुधारण्याचे खरे अग्रदूत ठरतात, असे प्रतिपादन प्रा. डॉ. प्रभाकर पवार यांनी केले.

मुधोजी महाविद्यालयाने आयोजित केलेल्या विशेष सप्ताहातील प्रबोधन कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. सौ. सरिता माने होत्या, तर प्रा. डॉ. नवनाथ रासकर, प्रा. डॉ. अनिल टिके, प्रा. डॉ. अशोक शिंदे आणि प्रा. डॉ. टी. पी. शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

‘थॉमस पेन’ यांच्या विचारांचा प्रभाव:

“भारतीय समाज क्रांतीचे अग्रदूत : क्रांतिबा फुले” या विषयावर बोलताना प्रा. डॉ. पवार पुढे म्हणाले की, क्रांतीबा फुले यांच्यावर थॉमस पेन यांच्या ‘मानवी अधिकार’ या ग्रंथाचा मोठा प्रभाव होता. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाची जाणीव झाल्यानंतर त्यांनी शिक्षण प्रसार व समाज सुधारणेवर भर दिला. सत्यशोधक समाजाची स्थापना करून त्यांनी सार्वजनिक सत्य धर्माचा आग्रह धरला. त्यांच्या या मानवतावादी कार्यामुळेच आधुनिक विचारसरणी, धर्मनिरपेक्षता व विज्ञानवादाला गती मिळाली.

फुले दांपत्याचा वसा पुढे नेण्याचे आवाहन:

सत्यशोधक विचारांच्या प्रभावातून हजारो कार्यकर्ते तयार झाले. राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील, संत गाडगेबाबा आणि श्रीमंत मालोजीराजे यांनी हा विचार विविध उपक्रमांद्वारे समाजभर पसरवला. आजच्या समाजानेही क्रांतीबा आणि सावित्रीबाई फुले यांच्या या क्रांतिकारक कार्याचा वसा घेऊन भारतीय समाजव्यवस्था मजबूत केली पाहिजे. विज्ञान आणि शिक्षणाचा ध्यास घेऊन भारतीयांनी आधुनिकता स्वीकारली पाहिजे, असेही प्रा. डॉ. पवार यांनी आवर्जून सांगितले.

समाज सुधारणेची नितांत आवश्यकता:

अध्यक्षीय मनोगतात प्रा. डॉ. सौ. सरिता माने म्हणाल्या की, भारताला त्यावेळी समाज सुधारणेची नितांत आवश्यकता होती. क्रांतीबा फुले यांनी स्त्रियांचा विकास आणि ज्ञानाचे महत्त्व ओळखून अज्ञान, अंधश्रद्धा, कर्जबाजारीपणा, भोंदूगिरी आणि बुवाबाजीला आळा घालण्यासाठी सत्यशोधक समाजाद्वारे मोठे प्रयत्न केले.

या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. नवनाथ रासकर यांनी केले, तर सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रा. अंकुश खोब्रागडे यांनी केले.


Back to top button
Don`t copy text!