स्वच्छतागृह सुरु करण्यासाठी कोरेगावकारांनी केले भीक मांगो आंदोलन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य,कोरेगाव, दि.२४:  काम पूर्ण होवून सुद्धा गेल्या दीड वर्षांपासून बंद अवस्थेत असलेले स्वच्छतागृह सुरू करण्यासाठी कोरेगावकारांनी केलेल्या भीक मांगो आंदोलनामुळे आज पुन्हा एकदा नगरपंचायत प्रशासनाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.
कोरेगाव नगरपंचायत नागरिकांचे मूलभूत प्रश्न सोडविण्यात सपशेल अपयशी ठरली असून सोनेरी ग्रुप व कोरेगाव मधील सुज्ञ नागरिक गेल्या अनेक दिवसांपासून मागणी करीत असलेल्या साखळीपूला जवळील बांधून पूर्ण असलेले सार्वजनिक स्वच्छतागृह सुरू करण्यासाठी चक्क आज भीक मांगो आंदोलन करण्यात आले.
कोरेगाव नगरपंचायतीने स्वच्छता सर्वेक्षण मोहिमेत मिळविलेल्या बक्षीस रकमेतून सुमारे ३० लक्ष रुपयांची तरतूद असलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृह उभारणीसाठी पुण्याच्या एका ठेकेदार कंपनीला डिसेंबर २०१८ मध्ये काम दिले होते, सदरचे काम हाती घेत असताना साखळी पुला जवळील जुने स्वच्छतागृह पाडण्यात आले होते, त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली होती. ठेकेदार कंपनीने स्वच्छतागृहाचे काम पूर्ण करून दीड वर्ष झाली तरी नगरपंचायत प्रशासनाने काही तांत्रिक बाबीमुळे ते खुले केले नाही, परिणामी नागरिकांमधून वारंवार तक्रारी येत होत्या, या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या नगरपंचायतीला सोनेरी ग्रुपने सातत्याने जाब विचारला मात्र त्यावर कोणताही ठोस निर्णय न झाल्याने संतप्त नागरिकांसह सोनेरी ग्रुपने दि. ८ फेब्रुवारीला स्वच्छता गृहाच्या दारात उपोषणाला बसून प्रशासनाचे लक्ष वेधले होते, त्यावेळी चार दिवसांत स्वच्छतागृह सुरू करण्याचे अभिवचन नगरपंचायतीने दिले होते, मात्र पुन्हा महिना उलटूनही केवळ प्रोत्साहन निधी नसल्याचे कारण देत प्रशासन नागरिकांना झुलवत असल्याचे लक्षात आल्यानंतर सोनेरी ग्रुपने आज नगरपंचायतीला प्रोत्साहन निधी मिळवून देण्यासाठी चक्क शहरात फिरून भीक मांगो आंदोलन करत नगरपंचायतीचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणला.
नगरपंचायत कार्यालयापासून जानाई, कापडपेठ, बुरुडगल्ली, रामलिंग नगर मार्गे, जुना स्टँड वरून हे भीक मांगो आंदोलन शेवटी साखळी पुला जवळील स्वच्छतागृहाच्या दारात संपले. लोकशाही मार्गाने झालेल्या या आंदोलनात सोनेरी ग्रुप, सोनेरी सखी मंच, कोरेगाव नगर विकास कृती समितीचे सदस्य सहभागी झाले होते.
दरम्यान, स्वच्छतागृह सुरू करण्यासाठी अवघ्या महिन्यातच दुसऱ्यांदा झालेल्या या अनोख्या आंदोलनाची आज कोरेगाव शहरात जोरदार चर्चा सुरू होती.
मुख्याधिकाऱ्यांनी पाठवले राज्यशासनाला पत्र
साखळी पुला जवळील स्वच्छता गृह सुरू करण्यासाठी संबंधित ठेकेदाराला देणे बाकीची पूर्तता कशी करावी यासाठी कोरेगाव नगरपंचायतीने आज राज्याच्या स्वच्छता अभियान संचालकांना पत्र पाठवले आहे, त्यांचा निर्णय आल्यानंतर स्वच्छतागृह सुरू केले जाईल असे पत्राद्वारे आंदोलकांना कळविले आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!