
कोळकीतील सहा अंगणवाड्यांना भाजप महिला पदाधिकारी व ग्रामपंचायत सदस्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन मुलांची पटसंख्या, पोषण आहार व दैनंदिन कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला.
स्थैर्य, कोळकी, दि. ०१ ऑक्टोबर : कोळकी परिसरातील सहा विविध अंगणवाड्यांना भाजप महिला आघाडीच्या पदाधिकारी आणि ग्रामपंचायतिच्या माजी सदस्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी अंगणवाडीतील बालकांची पटसंख्या, पोषण आहार आणि एकूण कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
सहा अंगणवाड्यांची प्रत्यक्ष पाहणी
कोळकी येथील नुरसेबानगर अंगणवाडी क्रमांक ९ (पटसंख्या २८), नेवसेवस्ती अंगणवाडी क्रमांक ७ (पटसंख्या २९), राधिका गार्डन अंगणवाडी क्रमांक ८ (पटसंख्या १९), बुवासाहेबनगर अंगणवाडी क्रमांक ५ (पटसंख्या २३), मालोजीनगर अंगणवाडी क्रमांक ४ (पटसंख्या १५) आणि वनदेवशेरी अंगणवाडी क्रमांक १ (पटसंख्या ४१) या ठिकाणी ही पाहणी करण्यात आली. यावेळी पवार, दंडिले, जठार, जमदाडे, काळोखे आणि लिपारे या अंगणवाडी सेविकांशी संवाद साधून कामकाजाची माहिती घेण्यात आली.
महिला पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती
या पाहणी दौऱ्यात भाजप तालुका अध्यक्ष उषा राऊत, जिल्हा उपाध्यक्ष रेश्मा देशमुख, जिल्हा सरचिटणीस विमल भुजबळ, जिल्हा चिटणीस सोनिया फाळके, कोळकी ग्रामपंचायतीच्या माजी सदस्य प्राजक्ता काकडे, रूपाली चव्हाण, फलटण शहर उपाध्यक्ष प्रियांका कदम आणि संध्या पवार उपस्थित होत्या. अंगणवाड्यांमधील भौतिक सुविधा व बालकांच्या आहाराबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.



