काटेकोर नियोजनातून खरीप हंगाम यशस्वी करावा – भाग्यश्री फरांदे


दैनिक स्थैर्य । दि. ०५ मे २०२३ । सातारा । कृषी विभाग आणि कृषी सेवा केंद्र यांनी पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांच्या साह्याने काटेकोरपणे नियोजन करून येणारा खरीप हंगाम यशस्वी करावा अशा सूचना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे  यांनी दिल्या.

सातारा तालुका खरीप हंगाम पूर्व आढावा सभा आणि  नियोजन   कार्यक्रमात  त्या बोलत होत्या. यावेळी कृषी विकास अधिकारी विजय माईनकर, तालुका कृषी अधिकारी हरिश्चंद्र धुमाळ,  डीलर असोसिएशन चे अध्यक्ष राजनशेठ मामनिया, कृषिभूषण मनोहर साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते.

सौ. फरांदे पुढे म्हणाल्या की सातारा तालुक्याला चांगली कसदार जमीन, पाण्याची उत्तम सोय आणि रस्ते यासारख्या सुविधा लाभल्या असून त्याचा योग्य तो फायदा घेऊन कृषी विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी पुरस्कार प्राप्त  प्रगतशील  शेतक-यांच्या मदतीने नवीन शेतकऱ्यांना तयार करावे. सोयाबीन बियाणे बदल, ऊस सुपर केन नर्सरी, सूर्यफूल, जवस तीळ, आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाच्या निमित्ताने राळा, वरी, नाचणी लागवड इत्यादी नाविन्यपूर्ण बाबींचे काटेकोरपणे नियोजन करून खरीप हंगाम यशस्वी करावा.

खरीप हंगामाचे  आगामी नियोजन याविषयी तालुका कृषी अधिकारी हरिश्चंद्र धुमाळ यांनी सविस्तर  सादरीकरण केले.  कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ भूषण यादगिरवार  यांनी खरीप हंगाम पिका विषयी  मार्गदर्शन केले. नागठाणे येथील कृषिभूषण शेतकरी मनोहर साळुंखे, गणेश साळुंखे यांनी मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमास पुरस्कार प्राप्त, प्रगतशील आणि पीक स्पर्धेतील विजेते शेतकरी तसेच कृषी सेवा केंद्राचे संचालक,  कृषी विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी होते.

कार्यक्रमाची प्रास्ताविक मंडल कृषी अधिकारी सुहास यादव यांनी केले. सूत्रसंचालन  कृषी सहाय्यक अंकुश सोनावले यांनी तर आभार मंडल कृषी अधिकारी युवराज काटे यांनी व्यक्त केले.


Back to top button
Don`t copy text!