राज्यात सुरू असलेली विकासकामे ‘मिशन मोडवर’ पूर्ण करावीत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश


दैनिक स्थैर्य । दि. ०५ मे २०२३ । मुंबई । राज्यात सुरू असलेली आणि प्रस्तावित विविध विकासकामे मिशन मोडवर पूर्ण करावीत. जेणेकरून सामान्य नागरिकांना त्याचा लाभ मिळू शकेल, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे विविध विभागांच्या सचिवांना दिले.

खासदार गजानन किर्तीकर, खासदार गोपाळ शेट्टी, आमदार अमित साटम, आमदार संजय गायकवाड या लोकप्रतिनिधींच्या मतदारसंघांमधील विविध विकास कामांविषयी आढावा घेणारी बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे झाली. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव यावेळी उपस्थित होते.

लोकप्रतिनिधींच्या मतदार संघामध्ये सुरू असलेले रस्ते, उद्याने, जलसिंचन प्रकल्प, वळण रस्ते, उड्डाणपूल ही विकासकामे कालबद्धरित्या पूर्ण करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी मिशन मोडवर काम करावे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ह्या सर्व विकासकामांचा प्रत्यक्ष फायदा सामान्यांना मिळाला पाहिजे. त्यासाठी आवश्यक त्या प्रक्रियांना गती देऊन कामे पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील खेळांची आणि मनोरंजनाची मैदाने देखभाल तत्वावर हस्तांतरित करण्यास शासनाने दिलेली स्थगिती उठवावी, अशी मागणी यावेळी खासदार श्री. किर्तीकर, श्री. शेट्टी यांनी केली. याबाबत सविस्तर चर्चा बैठकीत करण्यात आली. यासंदर्भात एक धोरण तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्तांना दिले. वर्सोवा अंधेरी येथील खाडीतील गाळ काढणे, त्या ठिकाणी नवीन मच्छ‍िमार जेट्टी बांधणे याविषयी चर्चा झाली.

आमदार संजय गायकवाड यांच्या बुलढाणा मतदारसंघातील विविध विषयांबाबत यावेळी चर्चा झाली. बोदवड परिसर उपसा सिंचन योजनेमुळे सुमारे ४३ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. परिसरातील शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार असल्यामुळे या योजनेला गती द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी जलसंपदा विभागाच्या अपर मुख्य सचिवांना दिले.

बुलढाणा शहरालगत कृषी महाविद्यालय स्थापन करणे, मोताळा तालुक्यात नवीन एमआयडीसी स्थापन करणे, बुलढाणा शहराला रिंग रोड मंजूर करून बुलढाणा-खामगाव रस्त्यावरील बोथा अभयारण्यात उड्डाणपूल बांधणे, राजूर घाटात एकेरी वाहतूक करणे आदी विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली.


Back to top button
Don`t copy text!