दैनिक स्थैर्य । दि. २० एप्रिल २०२२ । मुंबई । खारघरच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात झालेल्या दुर्घटनेवरून राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यपाल रमेश बैस यांना पत्र पाठवले आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यावेळी घडलेल्या दुर्दैवी घटनेची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी अशी मागणी अजित पवारांनी पत्राद्वारे केली आहे. नुकतेच काँग्रेसनेही राज्यपालांना या घटनेबाबत विशेष अधिवेशन बोलावून निष्काळजीपणा केलेल्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. विरोधकांकडून खारघरमधील घटनेला सरकारला जबाबदार धरलं जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर मागणी करण्यात येत आहे. आता, मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी चौकशी समिती नेमण्यात आल्याची माहिती दिली.
खारघर (जि. रायगड) येथे ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्यानंतर झालेल्या दुर्दैवी घटनेच्या संदर्भातील वस्तुस्थिती तपासण्याकरिता एक सदस्यीय समिती नियुक्त करण्यात येत आहे. महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांची ही समिती असेल. एका महिन्याच्या मुदतीत ही समिती याबाबतचा अहवाल सादर करेल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटरवरद्वारे दिली. तसेच, भविष्यातील अशा प्रकारच्या समारंभाच्या आयोजनाच्या बाबतीत कोणत्या गोष्टींची काळजी, दक्षता घ्यावी, याबाबतही ही समिती शासनास शिफारशी करेल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
अजित पवारांनी पत्रात काय म्हटले
महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यावेळी झालेल्या दुर्घटनेत १४ निष्पाप अनुयायांचा मृत्यू झाला. मी स्वत: घटनेच्या दिवशीच रात्री उशिरा रुग्णालयात जाऊन रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची भेट घेतली. या गंभीर घटनेची निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी करावी. या दुघर्टनेबाबत वेगवेगळी माहिती सोशल मीडियातून समोर येतेय. कार्यक्रमात चेंगराचेंगरी झाली व त्यात अनुयायांचा मृत्यू झाला. उपस्थितांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती. ७ तास ते पाण्याशिवाय व अन्नाशिवाय होते. त्यामुळे अनेकांना उन्हाचा त्रास झाला. गर्दीचे योग्य नियोजन न केल्याने रुग्णवाहिका रुग्णांपर्यंत पोहचण्यास विलंब झाला. त्यामुळे वेळेवर उपचार मिळू शकले नाहीत. राज्यात उष्णतेची प्रचंड लाट असताना उघड्यावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी निवडण्यात आलेल्या कंपनीला अशा भव्य कार्यक्रम आयोजन करण्याचा अनुभव नव्हता. जाहीर करण्यात आलेल्या मृतांच्या संख्येपेक्षा अधिक अनुयायांचा मृत्यू झालाय असं समोर येत आहे. त्यामुळे सर्व बाबींचा शहानिशा करून त्यामधील सत्य जनतेसमोर येणे अत्यंत गरजेचे आहे असं पत्रात म्हटलं आहे.