दैनिक स्थैर्य । दि.०८ जानेवारी २०२२ । खंडाळा । खंडाळा पंचायत समितीचे माजी सभापती व विदयमान सदस्य राजेंद्र तांबे यांना अपात्र करण्याची खंडाळा पंचायत समिती सदस्य चंद्रकांत यादव यांची मागणी अपर आयुक्त डॉ. अनिल रामोड यांनी फेटाळली आहे. राजेंद्र तांबे एका पेक्षा अधिक संस्थांवर सभापती म्हणून कार्यरत असल्याने त्यांना अपात्र करण्याची पंचायत समिती सदस्य चंद्रकांत यादव यांचा अर्ज अतिरिक्त विभागीय आयुकत पुणे डॉ. अनिल रामोड यांनी नामंजुर केला आहे.
खंडाळा पंचायत समितीचे शिरवळ गणातील राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे पंचायत समिती सदस्य अनंत उर्फ राजेंद्र तांबे यांनी एका पेक्षा जास्त संस्थावर सभापती म्हणून कार्यरत असल्याने त्यांना अपात्र ठरविण्यात यावे असा तक्रारी अर्ज अतिरिक्त विभागीय आयुकत पुणे डॉ. अनिल रामोडे यांचेकडे पंचायत समितीचे सदस्य चंद्रकांत सोपान यादव यांनी केला होता. चंद्रकांत यादव यांनी केलेल्या तक्रारी अर्जात म्हटले होते की, दि.३१-१२-२०१९ रोजी खंडाळा पंचायत समितीच्या सभापतीपदाच्या झालेल्या सभापती निवडणूकीत राजेंद्र तांबे सभापती म्हणून निवडून आले होते. त्याच बरोबर लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, खंडाळा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखाना संचालक, धर्मवीर संभाजी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादीत शिरवळ या सहकारी संस्थेवर चेअरमन म्हणून कार्यरत आहेत. एकापेक्षा अधिक सहकारी संस्थेवर सभापती म्हणून कार्यरत असताना त्यांनी ही बाब पिठासीन अधिकारी यांचेपासून लपवून ठेवलेली असल्याने ते पंचायत समिती खंडाळाचे सदस्य सभापती म्हणून चालू राहणेस अपात्र ठरत आहेत यावरून त्यांचेकडून महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ मधील तरतुदीचा भंग झालेला असल्याने त्यांना पंचायत समिती सदस्य / सभापती म्हणून सुरु / चालू राहणेस अपात्र ठरवावे अशी मागणी केलेली होती.
या अर्जावर सुनावनी घेण्यात येऊन दोन्ही बाजुचे म्हणणे ऐकुन घेतल्यानंतर अतिरिक्त विभागीय आयुक्त पुणे डॉ.अनिल रामोड यांनी
अर्जदार यांनी सादर केलेले कागदोपत्री पुरावे , तसेच सामनेवाले यांनी दाखल केलेले लेखी म्हणणे व कागदोपत्री पुरावे इत्यादी बाबींचे अवलोकन केले असता राजेंद्र तांबे यांचेकडून महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम १ ९ ६१ चे कलम ६४ ( ४ ) मधील तरतुदीचे उल्लंघण / भंग झाल्याचे स्पष्ट होत नाही. त्यामुळे ते पंचायत समिती खंडाळाचे सदस्य , सभापती म्हणून सुरु चालू राहणेस अपात्र ठरत नाहीत असा आदेश देऊन अर्जदार चंद्रकांत यादव यांचा अर्ज अमान्य नामंजूर केला आहे. या निर्णया विरोधात राज्य शासनाकडे ३० दिवसाचे आत अपील दाखल करता येणार आहे. या निर्णयामुळे राजेंद्र तांबे यांचे खंडाळा पंचायत समितीचे सदस्यपद कायम राहिले आहे.