खंडाळा: गोळीबार प्रकरणातील फरार अल्पवयीन संशयित जेरबंद – फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई


खंडाळा येथे तमाशाच्या ठिकाणी झालेल्या वादातून पिस्तुलमधून गोळीबार करणाऱ्या दोन फरार अल्पवयीन संशयितांना फलटण ग्रामीण पोलिसांच्या पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले आहे.

स्थैर्य, फलटण, दि. 8 मे : खंडाळा येथील महाराष्ट्र बेकरीसमोर झालेल्या वादातून पिस्तुलमधून गोळीबार (फायरिंग) करणाऱ्या प्रकरणातील दोन फरार अल्पवयीन संशयितांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून या संशयितांना ताब्यात घेतले असून, पुढील तपासासाठी त्यांना खंडाळा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

तमाशाच्या ठिकाणी झाला होता वाद:

दि. ७ मे रोजी रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास खंडाळा येथे एका तमाशाच्या ठिकाणी तक्रारदार आणि संशयित आशुतोष ऊर्फ बट्या संतोष जाधव (रा. साखरवाडी, ता. फलटण) तसेच त्याच्यासोबत असलेल्या दोन अल्पवयीन संशयितांमध्ये धक्का लागल्याच्या कारणावरून वाद झाला होता. या वादातून संशयितांनी तक्रारदारास मारहाण करत एकाने पिस्तुलमधून चार राऊंड फायर केले. यातील एक संशयित जागीच पकडला गेला होता, मात्र दोन अल्पवयीन संशयित घटनास्थळावरून फरार झाले होते. याप्रकरणी खंडाळा पोलीस ठाण्यात शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

साखरवाडीतही पिस्तुलाचा धाक दाखवून मारहाण:

या गोळीबाराच्या घटनेपूर्वी याच तिन्ही संशयितांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साखरवाडी येथे पैसे परत न देण्याच्या कारणावरून एकास पिस्तुलाचा धाक दाखवून मारहाण केली होती. याप्रकरणी त्यांच्यावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातही स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गोपनीय माहितीच्या आधारे सापळा:

या गंभीर गुन्ह्यातील दोन्ही फरार अल्पवयीन संशयितांचा शोध घेण्यासाठी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांनी विशेष पथके तयार केली होती. हे संशयित एका ठिकाणी लपून बसल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने सापळा रचून दोन्ही अल्पवयीन संशयितांना शिताफीने ताब्यात घेतले.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण ग्रामीणचे पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ, सहायक पोलीस निरीक्षक सुबनवळ, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक पवार, पोलीस उपनिरीक्षक शिवानी नागवडे आणि त्यांच्या पथकातील नितीन चतुरे, महादेव पिसे, अमोल जगदाळे, श्रीनाथ कदम, हणमंत दडस, सुरज काकडे, श्रीकांत खरात, अमोल देशमुख यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.


Back to top button
Don`t copy text!